घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप – राज्यातील पहिला उपक्रम
चंद्रपूरात १,१८३ लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून दिली जाणार ५,९१५ ब्रास रेती
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलासाठी शासन मोफत रेती देणार असल्याची घोषणा केली होती. आज ती घोषणा प्रत्यक्षात आली असून चंद्रपूर शहरातून याची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना आपले हक्काचे घर उभारताना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलाच्या कामासाठी शासनातर्फे मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत वढा रेती घाटावरून लाभार्थ्यांना रेती वितरित करण्यात आली. एका लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. या कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेतीचे ट्रॅक्टर रवाना करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थी नागरिकांना रेतीच्या टीपी चे ही वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार खंडारे, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगडे, मंडळ अधिकारी प्रकाश दुर्वे, भाजप नेते प्रकाश देवतळे, वढा गावचे सरपंच किशोर वराडकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, राकेश पिंपळकर, धनंजय नागरकर, खुटाळा येथील माजी उपसरपंच गुड्डू सिंग, धनराज हनुमंते, समीर भिवापूर यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, घरकुलाचे अनुदान मिळाल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेती घाटांचे लिलाव थांबलेले असल्याने घरकुल मंजूर होऊनही घराचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे माझ्यासह अनेक आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
आजच्या कार्यक्रमात प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. ही रेती शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने घाटावरून मोफत दिली जात आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. शासनाची ही कृती म्हणजे गरजूंना मदतीचा हात देण्याचा एक चांगला उपक्रम आहे. आजचा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असून शासनाच्या घरकुल योजनेतून आपले घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी ही मोठी संधी आहे. ‘घरकुल योजना’ फक्त एका घरापुरती मर्यादित नाही, तर ती कुटुंबाचे भविष्य घडवते. स्वतःचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल म्हणजे चार भिंती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे हे घर उभे राहण्यासाठी शासनाने आपली साथ देणे ही जबाबदारी आहे. शासन गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील १,१८३ लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून एकूण ५,९१५ ब्राज रेती दिली जाणार आहे.

