prabodhini news logo
Home चंद्रपूर जनभावना लक्षात घेऊन रामबाग मैदानावरील जिल्हा परिषद इमारतीचा प्रस्ताव रद्द करा –...

जनभावना लक्षात घेऊन रामबाग मैदानावरील जिल्हा परिषद इमारतीचा प्रस्ताव रद्द करा – आ. किशोर जोरगेवार.

0
124

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली मागणी..

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामबाग मैदानावर जिल्हा परिषद प्रशासनाची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रामबाग मैदानावर जिल्हा परिषद प्रशासनाची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. यासंदर्भातले निवेदनही ना. बावनकुळे यांना दिले आहे.
रामबाग येथे होणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीला स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता, आमदार किशोर जोरगेवार यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला हे काम थांबविण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीसाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला. मात्र, मंजूर जिल्हा परिषद इमारत कोणत्या जागेवर होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री यांची भेट घेऊन रामबाग मैदानावर इमारत बांधण्याचा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, चंद्रपूर येथील मौजा सिव्हिल लाईन, नगर भूमापन क्र. ६६३, शिट नं. ८ नुसार २८,३३० चौ. मी. (सुमारे ७ एकर) क्षेत्रफळ असलेल्या रामबाग मैदानाची जागा जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. रामबाग मैदान हे हजारो नागरिकांचे व्यायाम, खेळ, चालणे, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवाद यांचे केंद्र आहे. इथे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या मैदानावर इमारत बांधणे अव्यवहार्य आहे.
रामबाग मैदानावरील बांधकामाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले असून, प्रस्तावित इमारतीचे काम थांबविण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाने लोकशाही मूल्यांचा आदर करून जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी पर्यायी जागा निश्चित करावी, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा परिषद इमारतीसाठी इतर ठिकाणी प्रशस्त जागा उपलब्ध आहेत, त्यामुळे रामबाग मैदान नागरिकांच्या वापरासाठी परत देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here