विश्रामगृह येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी वीजपुरवठा खंडित होण्यामागची कारणे शोधून, कायमचा तोडगा काढण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला कार्यकारी अभियंता दारवेकर, उपकार्यकारी अधिकारी राजेश खडसे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, मनोज पाल आदींची उपस्थिती होती.
शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासाबाबत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तांत्रिक बिघाड, देखभाल व इतर अडचणींचा त्वरित आढावा घेऊन, वीजपुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ हाती घेण्याचे आदेश यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महावितरणकडून शहरातील विविध भागांत होणाऱ्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याची कारणे तपासून, दुरुस्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी तातडीने निवारण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. नागरिकांना नियमित, अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. सतत वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर समस्या असून, त्यावर त्वरीत तोडगा काढणे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

