150 च्या वर दारू दुकानांवर कारवाई
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर, दि. 27 मे : मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची निर्मिती, त्याची वाहतूक व विक्री करणा-या 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा- या 151 दारु दुकानांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 129 अनुज्ञप्त्यांधारकांना एकूण 47 लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर 15 दुकाने 5 ते 15 दिवसांपर्यंतच्या कालावधीकरिता निलंबित ठेवण्यात आली आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 963 गुन्ह्यात 773 आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 42 वाहनांसह 98 लक्ष 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात अवैध दारुविरुद्ध केलेल्या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, विक्री, वाहतूक करणा-यांविरोधात नोंदविलेल्या 1840 गुन्ह्यात 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 135 वाहनांसह 1 कोटी 9 लक्ष 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 93 अन्वये सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यासाठी 249 प्रस्ताव सर्व उपविभागीय दंडाधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्री दुकानांचे अचानकपणे निरिक्षण केले जाते व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास विसंगती प्रकरण नोंदवण्यात येते. मागील वर्षभरात (एप्रिल 2024 ते मे 2025) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 151 अनुज्ञप्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते. ही विसंगती प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईस्तव सादर केली असता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 129 प्रकरणात प्रत्येकी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला असून गंभीर प्रकरणात दारु दुकानांचे व्यवहार 15 दिवसांपर्यत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षभरात नोंदविलेल्या प्रकरणात नियमांचे भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना एकूण 47 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर नोंदवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.
००००००

