शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रणाली येरपुडे विशेष जिल्हा प्रतिंनिधी, चंद्रपूर – दि. 19 : जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक गुणवत्तेचे ध्येय ठेवून सन 2025-26 या शैक्षणिक सत्राची सुरवात 23 जून 2025 पासून होत आहे. त्या अनुषंगाने सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल घेण्यात आली. यावेळी शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकर, राजेश पाताळे (माध्य.), उपशिक्षणधिकारी विशाल देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी अर्चना मासीरकर, शुभांगी पिनदूरकर, लेखाधिकारी राजेंद्र बुर्लाबार यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंह यांनी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती प्रगती, निपुण भारत अभियान या विषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ‘वाघांच्या गोष्टी’ या प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला, अशा विद्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी शाळा प्रवेशोत्सव, खासदार-आमदार शाळा भेटी, शाळा भेट, केंद्रप्रमुखांच्या जबाबदाऱ्या, बांधकाम, शिष्यवृत्ती परिक्षा व उपस्थिती, 25 टक्के पटसंख्या वाढविणे याबाबत मार्गदर्शन केले. राजेश पाताळे यांनी वरील घटकांसोबतच कार्य करताना बाह्यप्रेरणेपेक्षा अंतः प्रेरणा जागवून कार्य करावे असे सांगितले. मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना, शाळाबाह्य विद्यार्थी व वाहतूक सुविधा, विद्यार्थी सुरक्षा, शाळा अनुदान याविषयी उपशिक्षणधिकारी विशाल देशमुख यांनी माहिती दिली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी केले. संचालनविवेक इत्तडवार तर आभार शुभांगी पिजदूरकर यांनी मानले. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

