prabodhini news logo
Home अमळनेर विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडासंदर्भात अमळनेर येथे...

विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडासंदर्भात अमळनेर येथे सहविचार बैठक संपन्न

0
129

अमळनेर येथील सर्व शाखीय सोनार समाजाकडून भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणाऱ्या कृति आराखड्याचे स्वागत

विचारपीठावर आराध्यदैवत राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची प्रतिमा, सर्व शाखीय सोनार समाजाला दिला नवा ऐतिहासिक पायंडा

अमळनेर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक २४ जून – येथील लाड सोनार समाज संस्थेच्या कै कलावती रामचंद्र चित्ते सभागृहात सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठातर्फे विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडा संदर्भात मंगळवार दिनांक २४ जून २०२५ रोजी सहविचार बैठक आयोजित करण्यात आली. ही सहविचार बैठक अमळनेर येथील अहिर सुवर्णकार समाज संस्था, लाड सोनार समाज संस्था आणि वैश्य सोनार समाज संस्था यांनी निमंत्रित केली होती.

प्रारंभी सभागृहातील राष्ट्रीय संत शिरोमणी श्री. नरहरी महाराज यांच्या शिल्पास कुटुंबप्रबोधक आनंद मधुकर दुसाने यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विचारपीठावर अर्थात खुर्चीवर सर्व शाखीय सोनार समाजाचे आराध्यदैवत असलेले राष्ट्रीय संत शिरोमणी श्री. नरहरी महाराज यांची प्रतिमा ठेवून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील सर्व शाखीय सोनार समाजासाठी एक नवा ऐतिहासिक पायंडा पाडण्यात आला. सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांच्या कल्पनेतून अमळनेरकरांनी या सहविचार बैठकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला आणि या नवकल्पनेचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाची माहिती दिली. तसेच सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सेतुबंधन ही काळाची अनिवार्य गरज असल्याचे प्रतिपादन केले. अविवाहितांचे प्रश्न, विवाहनिश्चितीची समस्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण या सर्व शाखीय सोनार समाजाला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या आहेत. जागतिकीकरणानंतरच्या गतिमान काळात, एकविसाव्या शतकात भारतीय संस्कृतीतील विवाह संस्था आणि कुटुंब संस्था, विशेषतः संयुक्त कुटुंबपद्धती धोक्यात आल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थाभेद, संघटनाभेद, पदगर्विता, श्रेयवादासाठी होणारी चढाओढ यामुळे सर्व शाखीय सोनार समाज संघटित होण्याऐवजी अधिकच असंघटित होत आहे. ही आपल्या सर्व शाखीय सोनार समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. ज्यांना आपण आपल्या सर्व शाखीय सोनार समाजाचे आराध्य दैवत मानतो, त्या आद्यसंत, राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी आपल्या अभंगातून देवा मी तुझा सोनार असे म्हणत सर्व शाखीय सोनार समाजासाठी ऐक्याचा नारा दिला. आपल्या सर्व शाखीय सोनार समाजातील विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समाजचिंतन करून अनोखा कृति आराखडा तयार केला आहे. या कृति आराखड्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि मनापासून केल्यास निश्चितच आपल्या समाजातील अविवाहितांचे प्रश्न सुटतील. विवाहनिश्चिती विनाविलंब होऊ शकेल, घटस्फोटाचे प्रमाण कमी होऊ शकेल, याची आम्हांस मनस्वी खात्री आहे.

कृति आराखड्यातील १. प्रथम वधु वर परिचय संकलन समिती, २. पुनर्विवाह वधु वर परिचय संकलन समिती आणि ३. दिव्यांग वधु वर परिचय संकलन समिती या पहिल्या तीन समित्यांसंदर्भात प्रा. हेमलता रवींद्र भामरे यांनी माहिती देताना काही मासलेवाईक दाखले दिले. कृति आराखड्यातील सर्वच समित्या या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. आपल्या समाजातील विवाहविषयक समस्या सामूहिक प्रयत्नांतून सोडविण्यासाठी निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांची प्रतीक्षा आहे.

ज्येष्ठ सोनार समाजसेविका आणि समुपदेशिका सौ करुणाताई मधुकर सोनार यांनी परिचय पत्र पडताळणी समिती आणि अनुरूप परिचय पत्र निवड समिती या दोन समित्यांची माहिती दिली.

धुळे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा सहसमन्वयक, तसेच नेहमीच सत्याची बाजू जोरदार मांडणारे ॲड. अमित मधुकर दुसाने यांनी विवाहपूर्व समुपदेशन समितीमधील विवाहपूर्व समुपदेशन उपसमिती, विवाहपूर्व मानसशास्त्रीय समुपदेशन उपसमिती, विवाहपूर्व वैद्यकीय समुपदेशन उपसमिती यांची माहिती देताना या समित्यांची सर्व शाखीय सोनार समाजासाठी अनिवार्य गरज असल्याचे प्रतिपादन केले.

धुळे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲड (डॉ) राजेंद्र निकुंभ यांनी विवाहोत्तर समुपदेशन समितीमधील विवाहोत्तर समुपदेशन उपसमिती, विवाहोत्तर मानसशास्त्रीय समुपदेशन उपसमिती, विवाहोत्तर वैद्यकीय समुपदेशन उपसमिती आणि विवाहोत्तर विधी सल्ला समुपदेशन उपसमिती या चार उपसमित्यांच्या उपयुक्ततेची माहिती देताना सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, सोनार समाजातील विवाहविषयक समस्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण यांचे सामाजिकदृष्ट्या सूक्ष्म निरिक्षण करून हा दहा समित्यांचा अभ्यासपूर्वक कृति आराखडा तयार केला आहे. दहा समित्यांचा हा कृति आराखडा म्हणजे मिलिंदकुमार सोनार यांनी सर्व शाखीय सोनार समाजाला दिलेला अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन केले.

कुटुंबप्रबोधक आनंद मधुकर दुसाने यांनी कृति आराखड्यातील दहाव्या क्रमांकावर असलेल्या कुटुंबप्रबोधन समिती या समितीबद्दल माहिती दिली.

यावेळी उपस्थित असलेल्या समाज बांधव आणि भगिनी यांनी कृति आराखड्यावर मनोगत व्यक्त केले.

यावेळी अमळनेर येथे हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेची स्थापना आणि तिचा कार्यारंभ केल्याबद्दल या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैयाभाऊ ऊर्फ संदेश जगन्नाथ भामरे यांचा सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार, सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे धुळे जिल्हा समन्वयक ॲड (डॉ) राजेंद्र निकुंभ, जिल्हा सहसमन्वयक ॲड अमित मधुकर दुसाने यांनी सत्कार केला.

यावेळी मिलिंदकुमार सोनार यांनी अमळनेर येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे तालुका समन्वयक म्हणून ॲड. मयूर अफुवाले यांची निवड घोषित केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ॲड मयूर अफुवाले यांच्या निवडीचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here