अंमलबजावणी बाबत 9 जुलै रोजी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिंनिधी, चंद्रपूर – दि. 2 : सन 2018:19 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे https//mahadbt.maharashtra.gov.in/ ऑनलाईनरित्या राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन व नूतनीकरणच्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती 30 जून 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत प्रतीवर्षीचे अर्ज संख्या लक्षात घेता, नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून सदर अर्ज विहित वेळेत निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयांकडून लवकरात लवकर नवीन अर्ज नोंदणीकृत करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात याव्यात. जास्तीत जास्त अर्ज नोंदणीकृत होतील, याची महाविद्यालयांनी खातरजमा करावी. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता अर्ज नोंदणीकृत करणे हा देखील प्रवेश प्रक्रियेचाच भाग आहे त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी शिष्यवृत्तीच्या सर्व योजनांची माहिती प्रवेश माहिती पुस्तीकेद्वारे देण्यात यावी. जेणेकरून शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊन लगेच शिष्यवृत्ती/ फ्रीशिप योजनेचे अर्ज नोंदणीकृत होऊन विद्यार्थ्याला विहित वेळेत शिष्यवृत्ती / फ्रीशिप रकमेची अदायगी करता येईल.
याबाबत जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, अनुदानित/विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांचे अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत प्रत्यक्ष आढावा यावेळी घेण्यात येईल. सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावरील शिष्यवृत्ती अर्जाबाबत संपूर्ण माहितीसह सदर बैठकीस न चुकता उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

