खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्र सरकारला दरवाढ मागे घेण्याची मागणी

0
102

जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : १ जुलै २०२५ पासून रेल्वे तिकीट, एटीएम व्यवहार शुल्क, पॅन कार्ड नियम आणि गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयांचा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “देशातील जनता महागाईने त्रस्त असताना, मोदी सरकारने १ जुलैपासून विविध सेवांवर लादलेली ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. रेल्वे हे सामान्य माणसाच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. त्यात वाढ करून सरकारने गरिबांचा प्रवास आणखी महाग केला आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केलेले बदल आणि ओटीपीची सक्ती यामुळे सामान्य प्रवाशांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “एटीएममधून पैसे काढण्यावरील वाढीव शुल्क हा डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार आहे. बँका आणि वित्तीय संस्थांना याचा फायदा होईल, पण सर्वसामान्यांसाठी रोख व्यवहार करणे अधिक खर्चिक होईल. पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य करणे आणि नवीन नियम लागू करणे हे लोकांना अधिक त्रासात टाकणारे आहे. तर, गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करणे म्हणजे गृहिणींच्या बजेटवर दर महिन्याला महागाईची टांगती तलवार ठेवण्यासारखे आहे.”

खासदार धानोरकर यांनी ठामपणे सांगितले की, “मोदी सरकार केवळ धनदांडग्या उद्योजकांचे सरकार बनले आहे. त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही. निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाची स्वप्ने दाखवून आता जनतेला महागाईच्या खाईत लोटले जात आहे. मी मोदी सरकारला विनंती करते की, त्यांनी तातडीने या सर्व दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा, काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी पक्ष जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here