prabodhini news logo
Home पिंपरी चिंचवड प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – फुलपाखरू

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – फुलपाखरू

2
150

फुलपाखरू जीवनाचा आनंद

फुलपाखरे आवडत नाहीत अशी व्यक्ती या जगात असणे अशक्यच आहे. अगदी लहानपणापासून रंगीबेरंगी फुलपाखरांचे सर्वांनाच आकर्षण असते.

फुलपाखरू !
छान किती दिसते ! फुलपाखरू

या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू

कवी- श्री. ग.हा. पाटील यांची ही कविता आम्हाला शाळेत अभ्यासाला होती. कवितेतील वर्णन वाचून त्याबद्दल प्रेम आणि कुतुहल जास्तच वाढले. त्यांना हात लावून बघण्याचा खूप मोह व्हायचा पण ते पटकन दूर उडून जायचे, मग वाटायचे अरे त्यांना कसे कळते आपल्याला कोणीतरी पकडायला आले आहे, पण फुलपाखरू काही हाती लागत नसे.
मोठ्या वर्गात म्हणजे पाचवी सहावीत परीक्षेत निबंध लेखनाच्या प्रश्नात मी फुलपाखरू झाले तर हा विषय असायचा. त्याचे उत्तर म्हणून या कवितेचा अर्थ आणि संदर्भ घेऊन लिहिलेले आजही आठवते आहे.
फुलपांखरू झाल्यावर मला किती सुंदर पंख येतील आणि माझे हे रंगीत पंख पाहुन लोक एक सारखे माझे कौतुक करतील. माझे पंख पसरून हवे त्या फुलावर जाऊन बसेन हवे तिथे उडत जाईन. शाळा नाही, अभ्यास नाही या फुलांवरून त्या फुलांवर आणि वेलींवर मस्त उडत रहायचे. इतके सोपे आणि बाळबोध लिहिलेले असायचे.
शाळेत एकदा आमच्या बाईंनी फुलपाखराची माहिती सांगताना त्याचे आयुष्य पंधरा दिवस ते एक महिना असल्याचे सांगितले. तेव्हा खूपच वाईट वाटले. नंतर त्यांनी काळे फुलपाखरू आणि भुंगा यांची गोष्ट सांगितली होती. आपला काळा रंग पाहून दुःखी फुलपाखरू उडत नव्हते, एक भुंगा त्याच्या जवळ आल्यावर स्वतःचे रुप विसरून काळ्या फुलपाखराने त्या भुंग्याला तू काळा, विद्रूप आहेस असे हिणवले. त्यावर भुंगा म्हणाला मी काळा असलो तरी उडतो, फुला फुलातील मध चाखत माझे आयुष्य मजेत जगतो आहे. परमेश्वराने आपल्याला दोन पंख उडण्यासाठी दिले आहेत त्याचा मी पुरेपुर उपयोग करतो आहे. तुझ्यासारखा दुःखी होऊन कुढत बसत नाही. त्याचे ते शब्द ऐकून काळ्या फुलपाखराला हुरूप आला. ते उंच उंच उडले, रंगीत फुले पाहिली, इंद्रधनुष्य पाहिले, पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना त्याच्या पंखावर असलेले छोटे छोटे ठिपके पाहून तोही आनंदला.
दिवस आणि वर्षे भराभर सरली. पण फुलपाखराची गोष्ट मनावर कायमची कोरली गेली. त्याच्या इतक्या छोट्या आयुष्यात इतका आनंद घेऊ आणि देऊ शकतो, त्यालाही काही त्रास होत असेल ना. आपल्या इतक्या मोठ्या आयुष्यात आपणही त्याच्या सारखे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुख असो वा दुःख असो आपले जीवन आनंदाने जगता आले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद फुलातील मकरंदाप्रमाणे वेचता आला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला हीच शिकवण देते. आयुष्यात आपल्याला जगण्याची रोजच नवीन संधी मिळत असते. त्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. उत्साह हे नव्याने सुरवात करण्याचे प्रतीक आहे तर नैराश्य शेवटाचे.
आयुष्यात जेव्हा कधी निराश झाले असे वाटेल तेव्हा ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आपल्याला सकारात्मक दृष्टीने विचार करून आयुष्याला जगण्यासाठी नवीन चेतना देईल याची खात्री आहे.

फुलपाखरांच्या पंखांवरील विविध रंगी ठिपक्यांमुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. झाडाच्या पानावर, फुलांवर बसलेले फुलपाखरू पाहताना शांतता आणि निसर्गाची जादू पाहायला मिळते. फुलपाखरू फुलातील मध गोळा करत असताना, ते निसर्गातील परागीभवनाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावते. अशा दृश्यांमुळे आपल्याला निसर्गाच्या अद्भुत निर्मितीची आणि त्यातील लहानसहान घटकांच्या महत्त्वाची जाणीव होते. निसर्गाच्या साधेपणातील सौंदर्य आणि जीवनातील आनंद शोधण्याची प्रेरणा देते.

फुलपाखरू आपल्याला जीवनातील आनंद शोधण्याची प्रेरणा देते. तसेच आध्यात्मिक दृष्टीने विचार करता, आत्म्याच्या प्रवासाचे आणि परिवर्तनाचे एक प्रतीक आहे.
फुलपाखराचे आयुष्य अल्प असते, तरी ते आपल्या अस्तित्वाने सौंदर्य आणि आनंद पसरवते. हे आपल्याला जीवन क्षणभंगुर आहे याची आठवण करून देते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास प्रवृत्त करते.

फुलपाखरांकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास, सुरवंटापासून सुंदर फुलपाखरामध्ये होणारे परिवर्तन हे आध्यात्मिक वाढीचे आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे असे वाटते. हे दर्शवते की आपणही आपल्या जीवनात अडथळ्यांवर मात करून, स्वतःला नव्याने घडवू शकतो आणि अधिक सुंदर व्यक्ती बनू शकतो.

फुलपाखरू फुलांवरून मुक्तपणे विहार करते, जणू ते जीवनाचा खरा आनंद अनुभवत आहे. हे आपल्याला भौतिक बंधनातून मुक्त होऊन, आंतरिक शांती आणि आनंद शोधण्याची प्रेरणा देते.

फुलपाखरू आणि फुलाचे नाते हे निसर्गाशी असलेल्या आपल्या सखोल संबंधाचे प्रतीक आहे. हे आपल्याला निसर्गाच्या जवळ राहून, त्याच्या सौंदर्यातून आणि शांततेतून आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यास शिकवते. जीवनातील प्रत्येक लहान गोष्टीतही अध्यात्म दडलेले आहे आणि ते आपण सृष्टीतील छोट्या फुलपाखरा कडून अनुभवू शकतो.

लेखिका सौ. अंजली जोशी
चिंचवड

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here