
मातीचा सुगंध आपल्या शिवरायांच्या पावन भूमीवर, बाजीप्रभूंच्या असामान्य शौर्यामध्ये, ज्ञानोबा माऊलींच्या
अमृततुल्य भाषेमध्ये, तुकोबांच्या अभंगांमध्ये, आषाढी, कार्तिकीच्या दिंडीतील वारकऱ्यांमध्ये दरवळतो आहे.
या मातीतून राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांची झुंजार वृत्ती जन्माला आली.संभाजी राजांसारखे अनमोल रत्न उदयास आले.
म.फुले, शाहू महाराज, डॉ.आंबेडकर , लो.टिळक, स्वा.सावरकर यांनी स्वराज्याच्या मातीसाठीच आपल्या प्राणांचे
बलिदान दिले, साहित्यिक योगदान दिले.अन्यायाविरूध्द संघर्ष केला व भारताला एक नवीन दिशा दिली.महामानवाने तर राज्यघटना निर्माण करुन नवा इतिहास या मातीत घडवला.” ने मजसी ने परत मातृभूमीला” या काव्यपंक्तीतून
मातृभूमीची, तिथल्या मातीची ओढ प्रामुख्याने मनाला भिडते. हे अजरामर काव्य स्वा.सावरकर यांनी लिहिले.केसरी, मराठा वृत्तपत्रातून लोकमान्यांनी जहाल अग्रलेख लिहून इंग्रजांची झोप उडवली.या मातीची थोरवी खरंच अवर्णनीय आहे.
कुसुमाग्रज, पुलं, प्र.के.अत्रे यांनी मराठी साहित्याचे नवे दालन साहित्यिकांसाठी खुले केले. आपल्या मराठी भाषेला
अभिजात मराठीचा दर्जा मिळाला.आपली काळी आई जी धान्य पिकवते.शेतकरी बांधव काबाडकष्ट करून शेतीचे मशागत करतात त्या मातीचे गुणगौरव गावे तेवढे कमीच आहे.
झिम्माड पाऊस आल्यावर मातीच्या सुगंधाने वृक्षवल्ली, पशुपक्षी आनंदाने न्हाऊन निघतात.धरती हिरवा शालू परिधान करते व आपल्या रुपाने नभाला मोहित करते.
गानकोकिळा लता मंगेशकर, सुधीर फडके, भीमसेन जोशी अश्या अविस्मरणीय व्यक्तींचा खजाना या मातीने दिला.आपल्या भूमीवर पाकडयांनी वक्रदृष्टी टाकल्याने काश्मीरचे नंदनवन अपवित्र केल्याने आपण ” ऑपरेशन सिंदूर” राबवून आपल्या भारतभूमीचे रक्षण केले. अश्या या पवित्र मातृभूमीला माझे
त्रिवार वंदन.
लेखक जितेन्द्र विजय गोखले
निवृत्त माध्य.शिक्षक.
बदलापूर ता.अंबरनाथ















