
हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला भाग पडतात. ते त्याला जगण्याची एक दिशा देतात. जगायला लावणारी आशा कधी उत्कर्ष वाढवणारी तर मात्र कधी केवळ लोभस अशी असते. आता उन्हाळा ओसरत आला. परत एकदा गतवर्षाप्रमाणे माणूस धरतीकडे एका आशेने पाहतो आहे. धरती मात्र कधी निरभ्र तर कधी ढगाळलेल्या आकाशाकडे सतत टक लावून पाहत आहे. तिलाही आशा आहे, आस आहे.धरती आकाशाकडे आशेने पाहत असताना माणूस मात्र तिच्याकडे स्वार्थाने पाहतो आणि धरतीच्या मनाचा त्याने कधी विचारही केला नाही.
तर या धरतीला कशाची बरी आशा असेल? तिला हिरवा शालू चुडे नेसवणाऱ्या वरुणराजाची तर आशा नक्कीच असणार! यात तिळमात्र शंका नाही. पावसाच्या आगमनासाठी आसक्त झालेली धरती पाहिली की मनात काहूर माजतं. वरूणराजाच्या आगमनाच्या आशेने धरती मनातून फुललेली, आठवणीने बेहोश होऊन आतून भिजून चिंब झालेली दिसते तर तो आल्यानंतर त्याच्या मस्तीने धुंद झालेली माती डोळ्यातून सुटते थोडीच. हा पाऊस प्रणयानं,भुकेने,प्रेमानं कोसळताना भोळ्या मातीत एक प्रकारचा सुगंध पेरून सुरुवात करतो.
या सुगंधाने धरतीचं,निसर्गाचं, वाऱ्याचं निसर्गात असलेल्या साऱ्यांचं मन अगदी फुलून येतं, देहभान विसरून जातं. आणि हा मातीचा सुगंध! ही तर निसर्गाची अनमोल देणगी. या सुगंधी वाऱ्याच्या गंध लहरी तुझ्यापर्यंत, माझ्यापर्यंत, त्याच्यापर्यंत, तिच्यापर्यंत मनात खोलवर भिडल्या म्हणजे सर्व काही विसरून वेगळ्या जगात गेल्याचा भास होतो. यावेळी या धरतीला किती आनंद वाटत असेल? त्या भावना आपल्याला तिच्या मनात शिरून विचार केल्याशिवाय कळणार तरी कशा? तेही खरंच आहे. ज्याचा विचार केला, मनाच्या भोवती अल्हाद विळखा घातला, काळजात शिरायचा प्रयत्न केला त्याच्याच भावना कळत असतात.
पाऊस चालू झाला म्हणजे थुई थुई नाचणाऱ्या थेंबांच्या कोमल स्वरांनी तर उडणाऱ्या लाख लाख तृषारांनी धरती आपला आनंद व्यक्त करत असते. आनंद व्यक्त करणे हे मनाच्या पावित्र्याचं लक्षण असतं. पावसाच्या थेंबांची गर्दी कधी कधी तिला सहनही होत नसेल. कारण गर्दी आणि आवाज कोमल भावनांच्या मारक असतात.
हा मातीचा सुगंध निर्माण होतो खरा अन् आवश्यक ही असतो. पण त्याला निर्माण करण्यासाठी धरतीला किती कष्ट सोसावे लागतात? आपण कधी हा विचारही केला नाही. चार एक महिनाभर उन्हाळ्याचा दाह सहन केलेला. पुढे रात्रभर वारे पन्नास बावन्न मैलाच्या वेगाने वाहतात. कधी ते ढगांना पळवून लावून आसक्त धरतीला हिरमुसले करतात. हा सुरवातीला येणारा पाऊस माडाची झाडं उलटी सुलटी करतो तर कधी झिंज्या पसरून अंगात आलेल्या माणसांसारखी बेभान होऊन नाचणारी, पिंगा घालणारी जंगलं ही दाखवतो.
मात्र या सुगंधानं वातावरण चांगलंच उत्साहवर्धक होतं. याच वेळी क्षणात रागात असलेली विध्वंस बनलेली मनं पार बदलूनही जातात. मात्र एखाद्याला हा मातीचा सुगंध कोणाच्यातरी आठवणीने हैराण व्याकुळ करून सोडतो. ही तगमग ज्याच्या त्याच्या मनाला हेलावून सोडून काळजाला भिडलेली असते. हे नैसर्गिक सुगंधाचं सामर्थ्य आजकालच्या धुरकट, रोगट,भौतिक गंधात कुठलं असणार? कधी व्याकुळ झालेली धरती कदाचित म्हणतही असेल,
धुसरं धुक्यातून लहरी वरती
निरोप दे तु वायु संगे
व्याकुळले तव आगमनाला
स्वप्न असे नयनी रंगे
खरंच मानवी स्वभावाचं अनुरागात रूपांतर करणाऱ्या, जगण्याचा उल्हास वाढवणाऱ्या या मातीच्या सुगंधाला जपून, टिकवून, हृदयात साठवून ठेवण्याची क्षमता धरतीत मातीत यावी अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे?
कधी कधी असाच हा मातीचा सुगंध मनाला हेलावणी देऊन जातो अन् देह फुलून येतो. वेडे झालेले मन धरतीकडे पाहून म्हणू लागते,
जललहरी अन् पाऊस धारा
फुलवी मज हा सुगंध सारा
सुगंध मातीचा मन मोही
वेडी झाले रे तुझं सह मी ही
लेखक बलराज संघई
छत्रपती संभाजीनगर















