
पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते! फुलपाखरू
मी धरू जाता! येई न हाता
दुरच ते उडते ! फुलपाखरू
प्राचार्य गणेश पाटील यांच्या “छान किती दिसते फुलपाखरू!
या कवितेतील या ओळी फुलपाखरू पाहिल्यावर आपल्याला आठवतात.तशी लहानपणापासून आपल्याला फुलपाखरांचे आकर्षण ,ओढ असतेच.बागेत गेल्यावर अनेक सुंदर सुंदर फुलपाखरे आपल्याला दिसतात .त्यांचे पंख खूप सुंदर व आकर्षक रंगाचे असतात.त्यांच्या मिशा ही सुंदर असतात.फुलपाखरे मिशानी वास घेतात व पायाने चव ओळखतात.फुलपाखरे वेगवेगळ्या रंगाची,आकाराची असतात.
फुलपाखरांच्या २०,००० प्रजाती आहेत असा अंदाज आहे.’कैसर-ए-हिंद फुलपाखरू’ या फुलपाखरांचे “भारताचा सम्राट” असे टोपण नाव आहे.ही फुलपाखरे खुप दुर्मिळ असून पुर्व हिमालयात पहायला मिळतात. फुलपाखरांचे अनेक आकार असतात.सर्वात लहान फुलपाखराचे “वेस्टन पिग्मी ब्लू” असे नाव आहे.या फुलपाखरांचे पंख खूप लहान असतात.”
“ब्लू माॉरमाॉन “म्हणजे “राणी पाकोळी” हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाते.फुलपाखरे जास्तीतजास्त सहा महिने जगतात. तो एक छोटासा किटक असला तरी १७ किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने उडू शकतो.
.
साधारण पावसाळ्याच्या सुमारास खूप फुलपाखरे बागेत उडताना दिसतात.त्यांच्या पंखांवर सुंदर नक्षी असते.
फुलपाखरे खूप नाजूक असतात. त्यांना पकडायला आपण गेलो तर ती उडून जातात.लहान मुलांना फुलपाखरांचे खूप आकर्षण असते.फुलपाखरू स्वतः सुंदर असतेच पण ते सुंदर सुंदर फुलांवर उडतअसते.रंगाने,गंधाने भरलेल्या वातावरणात फिरत असते.ते खूप चंचल असते.सतत या फुलांवर त्या फुलांवर बसते.त्याचे जगणे आनंददायी असते.बागेत आपण गेलो तर सुंदर रंगाची नक्षी अंगावर मिरवणारी अनेक फुलपाखरे दृष्टीस पडतात. फुलपाखरे बागेतल्या वनस्पतींचे परागीकरण करतात.फुलपाखरांची उद्याने असतात.तिथे गेलो तर अनेक प्रकारची, रंगाची फुलपाखरे पहायला मिळतात. त्यांना पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो.आपणही फुलपाखरू होऊन या फुलांवर त्या फुलांवर उडत राहावे असे वाटू लागते. त्यांना धरायला गेलो तर ती सापडत नाहीत.. फुलपाखरांच्या उद्यानात फिरण्यासारखा दुसरा कोणताच आनंद नाही.त्यांच्या पंखांचे सौंदर्य न्याहाळताना आपण आपले दुःख विसरतो. लहान मुलांना तर त्याची भुरळच पडते.व फुलपाखरे ही लहान मुलांसारखी निरागस असतात.
फुलपाखरू कौतुकाचे प्रतिक आहे.काही संस्कृतीत समृद्धीचे,धेर्याचे प्रतिक मानले जाते.
लेखिका गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा















