
चारी दिशेला एक मातीतला सुगंध दरवळतो आणि पाऊस येण्याची चाहूल देऊन जातो. मातीच्या सुगंधात दरवळून मंत्रमुग्ध होऊन बळीराजा पेरणीसाठी नव्या दिवसाच्या पहाटेची वाट बघतो.
मातीचा सुगंध हा माणसाशी एक आपुलकीचं नात जोडून ठेवण्याचं काम करतो,मातीशी असलेली माणसाची नाळ घट्ट करतो.
मातीचा सुगंध असा असतो की बसल्या जागी स्थळकाळ कुठेही आपल्याला जाणवत असतो,आणि जुन्या आठवणींशी पुन्हा परिचय करून देतो.
पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुहास अनुभवला आहे का तुम्ही कधी ?
त्याला मृदगंध असे म्हणतात. मृदा म्हणजे माती गंध म्हणजे मातीतून निघणारा सुगंध.
पावसाची पहिली सर जेव्हा शेतातील मातीच्या ढेकळातून पाझरते,चिंब मोहरून जाते तेव्हा मृदगंध निर्माण होतो,आणि त्याच मृदगंधात पानापाण्यांच्या दवामध्ये एक नवीन बीज करारते आणि त्यात मृदगंध दरवळते.
जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या पाण्याने माती ओली होते,आणि त्या मातीत असणारे जिवाणू सक्रिय होतात.मातीत असणारे कवके,जिवाणू, काही सजीव जेव्हा सक्रिय होतात, तेव्हा त्यातून जिओस्मिन नावाचा रसायन तयार होतो.त्या रसायनामुळे मातीतून मृदगंध निर्माण होतो, त्यामुळे परिसर शेती वगैरे सुगंधित होते.
मातीच्या सुगंधात अनेक प्रकारचे सुगंध असू शकतात त्याचप्रमाणे लाकूड,शेवाळ, कवक,औषध,गवत, वाहते पाणी,वाहती हवा अशाच प्रकारे जमिनीवर आढळणारे खूप सारे घटक.
हा मातीचा सुगंध म्हणजे एक तुम्हाला अरोमाथेरपी देऊन जातो.आपल्या थकलेल्या मनाला आराम देऊन जातो, भूतकाळातील आठवणी ताज्या करून जातो आणि मनाशी असलेल्या भावना जागृत करून देतो.मातीचा सुगंध म्हणजे नैसर्गिक संयुगांच मिश्रण होय.
लेखिका प्रतीक्षा अविनाश ठाकरे
नाशिक















