prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – श्रावण…

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – श्रावण…

0
128

श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक महत्वाचा आणि शुभ महिना आहे. श्रावण हा हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे. हा महिना जुलै ते ऑगस्ट या महिन्या दरम्यान येतो. हिंदूसाठी विशेषतः भगवान शिवाच्या पूजेसाठी हा सर्वात पवित्र महिन्यापैकी एक मानला जातो. प्रादेशिक कॅलेंडर प्रणालीनुसार श्रावणाची सुरुवात अमावस्या किंवा पौर्णिमेने होते. उत्तर भारतात गुरू पौर्णिमेच्या नंतरच्या दिवशी श्रावण सुरू होतो. दक्षिण आणि उत्तर भारतात आषाढातील अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो. दरवर्षी प्रदेशानुसार तारखा बदलतात.
आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने श्रावणाचे महत्व आहे. सोमवार ज्याला श्रावण सोमवार व्रत म्हणून ओळखले जाते. यावेळी काशी विश्वनाथ, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर सारख्या शिवाच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी दिसून येते. याच बरोबर इतर देवतांचीही पूजा करण्यात येते. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, इत्यादी सण साजरे होतात. भाविक उपवास करतात. कावड यात्रा याच महिन्यात असते. या महिन्यात काही लोक मांसाहार मद्यपान टाळतात.
माणूस जेव्हा जंगलात दऱ्याखोऱ्यात रानटी अवस्थेत रहात होता, तेव्हा तो कोणताही धर्म किंवा श्रावण पाळत नव्हता. जग हे कोण्या ईश्वराने निर्माण केले नाही. जगाची उत्क्रांती झाली. मानवाच्या उत्क्रांत अवस्थेत मानव कल्याणासाठी धर्म निर्माण झाले. धर्माच्या ठेकेदारांनी धर्माचा उपयोग समाजाच्या शोषणासाठी केला. आज प्रचलित प्रथा परंपरांना धार्मिक रंग चढवून मांडले जात आहे. जसे उपवास करणे पोथ्या पुराण वाचणे.
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त असे काहीही नाही. जे उच्च उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे. आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो. त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतूनच आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिक याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धम्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे. शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती. पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध मंदिर होते. तिरुपती बालाजीचे मंदिर बौद्धांचे मंदिर आहे .
श्रावण मराठी महिन्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यालाच सणांचा महिना असेही म्हणतात. या महिन्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात भारतीय संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात. या महिन्यात सर्वांना मौजमजा करायला मिळते. या महिन्यात भरपूर पाऊस पडतो. याला पावसाचाच महिना म्हणतात. हा महिना श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. या काळात शेतीची कामे सुरूच असतात. या महिन्यात श्रावण पौर्णिमा येते. या पौर्णिमेला लोक सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण करतात. रक्षाबंधन सुद्धा याच महिन्यात साजरा करण्याची पद्धत आहे. श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी याच महिन्यात साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला असे पुराणात सांगितले आहे. श्रावणातील नवमीला बालगोपाळांचा गोपाळकाला असतो ते दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर बैलपोळा येतो. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी या दिवशी आपल्या बैलाची पूजा करतात. बैलांना नैवेद्य दाखवतात, आणि सर्व गावकरी मिळून बैलाची गावामध्ये मिरवणूक काढतात.

बौद्ध धम्मात श्रावण महिन्याचे महत्त्व

भगवान बुध्दांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करून समतेची स्थापना केली. भगवान बुध्दांनी विषमते विरुद्ध आंदोलन केले. पुढे बौद्ध धम्म सम्राट अशोकाच्या काळात प्रगतीच्या शिखरावर होता. पुढे परकीय आक्रमकांनी बौध्द सम्राटाची हत्या, भिक्खूच्या कत्तली करून चातुर्वर्ण्य व जातीव्यवस्था निर्माण केली. बौद्ध संस्कृतीचे विकृतीकरण झाले. त्यापैकीच श्रावणातल्या पारंपारिक कथा व परंपरा आहेत. विहारांची व त्यातील मुर्त्यांची तोडफोड करून त्यांचे वेगवेगळ्या तीर्थस्थानात रूपांतर केले. आज जेवढी जगात प्रसिद्ध ऐतिहासिक शिवाची मंदिरे आहेत ती पुर्वीची बौध्द विहारे आहेत.
बौध्द धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे, त्या पौर्णिमेपैकी श्रावण पौर्णिमा एक आहे. श्रावण पौर्णिमेला चार महत्वपूर्ण घटना घडल्या
1. तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालास धम्मदीक्षा दिली.
2. सुदत्ताने म्हणजेच अनाथपिंडकाने 160 बुध्दसुत्त मुखोत्गत सांगितले.
3. प्रथम धम्म संगीती, ही संगीती तथागत भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्या नंतर प्रथम श्रावण पौर्णिमेलाच झाली.
4. शून्यवादी महान आचार्य नागार्जुन यांची जयंती. अशा चार घटना श्रावण पौर्णिमेला घडल्या.
*वर्षावास*
भारताच्या इतिहासात बौद्ध धम्माचा इतिहास गौरवशाली होता. इ.स. पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी भगवान बुद्धाच्या नंतर मुख्यत: बौद्ध भिक्खूवर होती. निसर्गाचे निरीक्षण करून उन, वारा, पाऊस यापासून भिक्खूंना त्रास होऊ नये यासाठी वर्षावासाची सुरुवात केली. ‘वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास’. या वर्षावास काळात भिक्खूंनी एका ठिकाणी विहारात राहून बौद्ध उपासक उपासिकांना धम्म उपदेश करावा असा आदेश तथागतांनी भिक्खूंना दिला होता. पावसाळ्याचे तीन महिने तेथे राहून लोकांना बौद्ध धम्माचे प्रवचन देण्याचे काम भिक्खू करीत असत. लोक देखील तेथे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. या वर्षावास काळात ज्या प्रमाणे बौद्ध भिक्खू ‘विकाल भोजना वेरमणि’ सिक्खा पदं समाधियामि’ या शीलाचे पालन करीत असत, त्याच प्रमाणे उपासक लोक देखील या काळात उपोसथ पाळत असत. परंतु ही वर्षावासाची परंपरा पूर्णपणे नष्ट करणे त्यांना शक्य झाली नसल्याने एक वेगळी कथा रचून या श्रावण महिन्यात ब्राम्हणांनी तसाच उपवास करण्याची वेगळी प्रथा पाडली. आज लोक श्रावण सोमवार उपवास करतात.
भारतातील आजच्या प्रत्येक हिंदू धर्मीय नागरिकांचे पुर्वज बौद्ध होते. इतर कोणताही धर्म त्या काळात अस्तित्वात नव्हता. बुद्ध पूर्व काळात सिंधू संस्कृती, द्रविड संस्कृती आणि वैदिक संस्कृती होती, धर्म नव्हते. यावरून बौद्ध धम्म हा या देशातीलच नव्हे, तर संपूर्ण विश्वातील मूळ धर्म असून नंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व धर्मांचे अधिष्ठान आहे. यावरून श्रावण कसा पाळायचा याचा प्रत्येकाने विचार करावा.
एप्रिल ते जून या कालावधीत कडक उष्णता असते. उष्णतेमुळे मनुष्य, प्राणी यांचे हाल होतात. नद्या, तलाव, कालवे, विहिरी, कोरड्या पडतात. अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन लोकांचे हाल होतात. श्रावण महिन्यातील पावसाने पृथ्वीवर सजीवांना नवसंजीवनी मिळते, सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसते. श्रावण महिन्यात शेतकरी नवनवीन पिके घेतात. निसर्गही नवनवीन झाडांना जन्म देतो. श्रावण महिना हा मानव, प्राणी, पक्षी सर्वासाठी आनंदी वातावरण घेऊन येतो.

डॉ. हंसराज रंगारी कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here