prabodhini news logo
Home पिंपरी चिंचवड प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज

0
115

शांतता म्हणजे केवळ युद्धाचा किंवा भांडणाचा अभाव नाही, तर ती एक सकारात्मक स्थिती आहे जिथे सामाजिक सलोखा, परस्परांमधील प्रेम आणि समजूतदारपणा असतो. शांतता म्हणजे मनात आणि समाजात स्थिरता, सुव्यवस्था आणि आनंदी वातावरण असणे. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे,
शांतता म्हणजे केवळ बाह्यतः असलेले मौन नाही, तर ती मनाची एक आंतरिक अवस्था आहे. याचा अर्थ असा की, मनात कोणताही गोंधळ किंवा अशांती नसणे, तसेच कोणताही नकारात्मक विचार किंवा भावना नसणे. शांतता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवणे, तसेच आंतरिक आनंद अनुभवणे आणि हे अनुभवणे म्हणजेच शांततेचा आवाज ऐकणे होय.

शांततेचा आवाज हे एक प्रकारे आंतरिक मौन आहे जिथे आपण स्वतःच्या विचारांशी आणि भावनांशी एकरूप होतो. स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहू शकतो, आत्मनिरीक्षण करू शकतो आणि चिंतन करू शकतो. यामुळे मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक शांती मिळण्यास मदत होते.

या शांततेच्या आवाजात आपण अनेक विचारांच्या लाटा अनुभवतो. जसे की, समुद्राच्या लाटा, वाऱ्याचा आवाज, पक्षांचे किलबिलाट यांसारख्या नैसर्गिक आवाजांमध्येही शांतता अनुभवता येते. दुपारची शांतता, संध्याकाळची शांतता, अशा वेगवेगळ्या वेळी शांततेचे विविध अनुभव येतात. काही वेळा ती आत्ममग्नतेची समाधी असते, तर काहीवेळा उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती असते.

माणूस नेहमी शांततेचा शोध घेत असतो. शहराच्या गोंगाटातून, कामाच्या ताणातून, शांततेच्या शोधात असतो. आजकालच्या आपल्या व्यस्त जीवनात, गोंगाटात शांततेचे महत्त्व कमी होऊ नये. शांतता आपल्याला आंतरिक शांती आणि आनंद मिळवून देते.

शांततेचा आवाज म्हणजे, माणसाच्या म्हणजेच आपल्या आतून येणारा आवाज, ज्यामध्ये त्याची खरी ओळख दडलेली असते.

सौ. अंजली जोशी
चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here