prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज

0
141

लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क दिला असला तरीही हे आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे अशी अपेक्षा असते. ज्याला अहिंसक आंदोलन म्हटले जाते असे अहिंसक आंदोलन जरी करण्यात आले तरीही त्याला हिंसक वळण मिळत असल्याचेही पहायला मिळत असते. असे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होतो. सरकार दरबारी आपल्या रास्त असलेल्या मागण्या मांडण्यासाठी अशी सनदशीर आंदोलने जरी करण्यात आली तरी त्याची दखल घेतली जाईल याची खात्री नसते. त्यातून आंदोलकांचा संयम ढळतो आणि हिंसक वळण मिळण्याची शक्यता असते. तसेच अशा आंदोलनात समाजकंटक देखील गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. असे समाजकंटक जेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय होतात तेव्हा काय होईल याचा अंदाज देखील येत नाही. तर अशा प्रकारामुळे आंदोलन मग ते कोणतेही असले तरीही ते आणखी चिघळते. असा प्रकार राज्यात काय वा देशात काय? अनेकदा घडत असतो. अशा आंदोलनात शांततेचा आवाज नसतो. तेव्हा अशा प्रकाराला जबाबदार कोण? हाही प्रश्न निर्माण होत असतो.
एखाद्याला विचारले, अहो तुम्ही कुठचे? तो लगेच सांगतो मी नागपूरचा. दुसऱ्याला विचारले तो सांगतो मी अमरावतीचा, तिसरा सांगतो मी कोल्हापूरचा, चवथा म्हणतो मी रत्नागिरीचा. पाचवा म्हणतो मी जळगावचा. सहावा म्हणतो मी बुलढाण्याचा. काही सांगतात औरंगाबाद, मुंबईचा. जो तो आपापल्या गावाची, परिसराची कुठलीही कसर न ठेवता छानशी माहिती सांगत असतो. कारण कुठलेही गाव घ्या, प्रदेश घ्या, देश घ्या, ज्याचे त्याचे त्याबद्दल प्रेम असते, तिथल्या मातीशी अतुट नाते असते. भावना जुळलेल्या असतात. कारण त्या ठिकाणी तो लहानाचा मोठा झालेला असतो. तिथे वाढलेला असतो. कुटुंबाचा संबंध आलेला असतो. तिथला परिचित असतो. त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आकर्षण असणे अगदी साहजिक असते. तुमच्या कडील माणसे बरोबर नाहीत असे कुणी बोललेले कुणालाही आवडत नाही आणि कुणी तसे खपवून घेत नाही. ते खरेही आहे. कारण हा तर मानवी स्वभाव आहे. पण एवढेच करून भागणार नाही. तर तिथली माणसे सदाचारी प्रवृत्तीची आहेत की दुराचारी? नेमकी कशी आहेत, हे पण पाहणे महत्त्वाचे ठरते. कारण चांगल्या वाईटांचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो. नदीला आलेला महापूर जसा आजूबाजूचा परिसर प्रभावित करीत असतो. नदीकाठची घरे वाहून जातात. झाडे कोसळतात. जनावरे वाहून जातात. आजूबाजूच्या शेतीचे नुकसान करतात. माती वाहून गेल्याने जमीनीचा पोत बिघडतो. कधीही भरून न येणारी मनुष्यहानी होते. पण तोच प्रवाह आवाज न करता शांततेने, संथगतीने वाहात असला, तर आजूबाजूच्या परिसराचे नुकसान होत नाही. जनावरांसाठी पाणवठे तयार होतात. विहिरींना पाणी येते. लोकांना व शेतीला फायदेशीर ठरते. पाण्याचा नेमका प्रवाह कसा आहे, अतिदाबाचा की हलक्या दाबाचा? त्यावर सर्वकाही अवलंबून असते. लोकांचा जसा सहवास तशा बोलण्याच्या, चालण्याच्या वागण्याच्या सवयी परिणामकारक ठरत असतात. माणूस जिथे राहतो तिथे तो तिथल्या परिसराला आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार कवेत घेत असतो. लोकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. आपलेसे करीत असतो. दुर्जन लोक दुर्जनांच्या टोळ्या तयार करीत असतात. चुकीचा मार्ग अवलंबित असतात. स्वार्थासाठी वाटेल त्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करीत असतात. दुसऱ्याला त्रासदायक ठरत असतात. यामुळेच परिसरात अशांतता पसरायला लागते. हिंसाचार, खून, स्वैराचार, दुराचार वाढायला लागतो. मानवतेला हानी पोहोचत असते. तर सद्वर्तनी लोक सद्वर्तनी लोकांचा समूह तयार करीत असतात. लोकहिताचे उपक्रम राबवित असतात. लोकांना चांगल्या समाजोपयोगी गोष्टीकडे वळवित असतात. आकर्षित करीत असतांत. हाच त्यातला फरक, उदा. गुणवंतांचा सत्कार, महापुरुषांच्या जीवनावर परिसंवाद, विद्वानांची व्याख्याने, खेळांच्या स्पर्धा, प्रशस्तीपत्रांचे वाटप, गरजूंना दानधर्म, अन्नदान, वस्रदान, नेत्रदान, रक्तदान, व्यसनमुक्ती शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे अशा निरनिराळ्या प्रकारची शिबिर आयोजित करीत असतात. त्यामुळे लोकांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन मिळत असते. हा शांततेचा आवाज असतो आणि त्यातुनच शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता निर्माण होते. उन्नती बरोबर मानसिक आनंद मिळायला लागतो. परिस्थिती नेमकी कशी निर्माण करायची, हे तिथे राहणाऱ्या लोकांवर व जागेवर अवलंबून असते. कधी कधी मानवी प्रवृत्तीनुसार कुणी सांगितलेल्या ठिकाणाकडे कित्येकांचा ओढा असतो. आकर्षण असते. तसा तर माणूस कुठेही राहू शकतो. पण तो नेमके जगतो कशासाठी? मनाच्या समाधानासाठी ना? आयुष्यभर माणूस स्वतःसाठी, परिवारासाठी अर्थात मुलाबाळांसाठी व समाजासाठी जगत असतो. पण सर्व करून देखील मनाचे समाधान होत नसेल. तेव्हा मात्र माणूस अस्वस्थ व्हायला लागतो आणि त्यावर विचार करायला लागतो आणि शेवटी मी आजवर सर्वकाही माझ्यासाठीच केले. इतरांसाठी काय? तेव्हा मात्र आपण नेमके जगतो कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळून जाते. कारण इतरांच्या हितासाठी काहीतरी कुशल कर्म हातून घडण्याचा डोक्यात विचार येतो आणि तसेच घडते. तेव्हा मात्र मनाचे समाधान झाल्याशिवाय व आपण नेमके कशासाठी जगतो, या पश्नाचे उत्तरही मिळाल्याशिवाय राहात नाही. यासाठीच सद्वर्तनी लोकांचा सहवास व राहण्यास योग्य जिथे शांततेचा आवाज असेल असे ठिकाण मिळणे फार आवश्यक असते.
आयुष्यात किती पैसे कमावले, याला फारसे महत्व नाही. पण किती माणसे कमावले याला फार महत्त्व आहे. चांगला व्यक्तिच चांगली माणसे कमावू शकतात. त्यासाठीच मनुष्य जीवन महान आहे. पवित्र आहे. पण जगण्याचा काळ मात्र अल्प आहे. त्या अल्पकाळात माणसे जुळवता आली पाहिजेत व आयुष्याला सुगंधित करता आले पाहिजे. सत्कर्मी लावता आले पाहिजे, त्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. तो वाया जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. चांगला विचार, आचार आणि संस्कार योग्य ठिकाणी, योग्य लोकांच्या सहवासात घडून आला पाहिजे.
हजारो वर्षांपासून सागराच्या लाटां किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत. लाटा किनाऱ्याच्या दिशेने येतात, किनाऱ्यावर आदळतात आणि परत जातात. हे असे सतत घडत असतं. जीवन देखील हजारो वर्षांपासून अनंत-अनंत लाटांनी असचं उसळते आहे. नकीच ते उत्कर्ष गाठायच्या प्रयत्नात असावं. या सागरलहरी, या जीवनलहरी कुठे तरी पोहचण्याची इच्छा बाळगून असाव्यात. पण त्या किनाऱ्यावर आदळूनच नष्ट होतात. मग पुन्हा नव्या जोमाने, नव्या लहरी येतात. पण त्यांचीही अवस्था अशीच होते. सागर इतक्या हजारो वर्षांपासून संघर्ष करतो आहे. लाटा रोज उसळतात, मोठा आवाज करतात आणि परत जातांना मात्र शांततेचा आवाज करतात. पण या मागे हेतू तरी काय असावा? खात्रीने उत्कर्ष गाठण्याचा, खोलवर जाण्याचाच हा प्रयत्न असावा. जीवनात घडत असलेल्या सतत प्रक्रियेचाही असाच काही प्रयत्न चाललेला आहे. या प्रक्रियेचीही आपल्यापेक्षा श्रेष्ठ जीवन निर्माण करण्याची तीव्र इच्छा आहे.
स्वतःची तुलना इतरांशी न करता आपण सहजगत्या अनावश्यक चिंता आणि अडचणीतून मुक्त होवू शकतो. जोपर्यंत आपण इतरांना आपल्या बरोबरीचे, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानतो तोपर्यंत आपल्यातील असहिष्णुता आणि अशांती वाढणारच. जर आपण अभिमानाचा त्याग केला तर आपण स्वतःमध्ये शांती अनुभवू शकतो. आपण दुस-यामध्ये समरस होण्याचा प्रयत्न केला तर अशारितीने शांती व प्रसन्नतेचा अनुभव घेऊ शकतो.
मी कोण आहे? माझे काय आहे? जे आज माझे आहे ते उद्या माझे राहील काय? कधी कधी दिनचर्या ठरलेली नसते, एक घर असते, तिथे शांतता असते. तिथे केवळ शांततेचा आवाज घुमतो… तुम्ही बंगले बांधले, गुंतवणूक केली, फार्महाऊस, बसायला गाडी, राहायला माडी असे असले तरी चार भिंतीच्या आत बंदिस्त व्हावे लागते. तुम्ही राज्य पाहिली, देश विदेश फिरले, जीवनाच्या चढ-उतारांनंतर एका शांत आवाजात तुमचे मन तुम्हाला सांगेल, आता पुरे झालं, आता शेवटच्या प्रवासाला तयार हो… शेवटच्या प्रवासाची वेळ झाली आहे, तुम्ही पण शांत आवाजात उत्तर द्याल, मी जरी कधी आकाशात उडालो, पण आज जमिनीवर पाय ठेवतो. मी निसर्गाला शांततेच्या आवाजात विनंती करतो मला पैसे कमावणारे यंत्र नाही तर एक स्वाभिमानी सत्यवादी माणूस म्हणून एक जगण्याची संधी द्यावी. म्हणून शेवटी माणूस बना.

डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here