
मैत्री हे परस्पर स्नेह, विश्र्वास आणि समर्थन सामायिक करणाऱ्या व्यक्तीमधील खोल आणि अर्थपूर्ण नाते आहे. मित्र गरजेच्या वेळी साहचर्य, समजुतदारपणा आणि मदत देतात. जीवन अधिक समृद्ध आणि आनंददायी बनवतात. मैत्री हा मानवी जीवनाचा मूलभूत पैलू आहे, जे आपण अनुभवू शकतो. मैत्री सर्वात गहन आणि लाभदायक नाते दर्शविते. हे नाते ओळखीच्या पलिकडे आहे. परस्पर विश्वास, समज आणि समर्थन यामध्ये खोलवर रुजलेले आहे. मैत्रीचे सार आपले जीवन समृध्द करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. सांत्वन, आनंद आणि आपलेपणाची भावना आहे. मैत्रीमध्ये सामायिक अनुभव सामान्य आवडीद्वारे तयार होणारे बंध असतात. बंधन किंवा परिस्थितीने
बांधलेल्या नाते संबंधांच्या विपरीत मैत्री मुक्तपणे निवडली जाते, आणि परस्पर आदर आणि आपुलकीने टिकून राहते.
सुसंगतता, सामायिक मूल्ये आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद यावर आधारित मित्र एकमेकांना निवडतात. मैत्रीच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूपैकी एक म्हणजे प्रदान केलेला भावनिक आधार होय. खरे मित्र गरजेच्या वेळी असतात. ते सहानुभूती, समजूतदारपणा आणि प्रोत्साहन देतात. ते मनात एक सुरक्षित जागा प्रदान करतात. जिथे व्यक्ती निर्णयाच्या भितिशिवाय त्यांचे आंतरिक विचार आणि भावना व्यक्त करू शकतात. हा भावनिक आश्रयपण महत्त्वपूर्ण आहे, कारण ते जीवनातील गुंतागुंत अधिक लवचिकतेने पार करू शकतात. शिवाय मैत्री वाढीस हातभार लावतात.
मित्रांशी संवाद साधून, व्यक्ती अनेकदा नविन दृष्टिकोन आणि अंतदृष्टी प्राप्त करतात. आणि ते त्यांच्या विचारांना आव्हान देतात, आणि त्यांचे क्षितिजे विस्तृत करतात. हे प्रोत्साहन आत्ममुल्य आणि आत्मविश्वासाची भावना वाढवते. जी परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे. मैत्री टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न आणि वचनबद्धता आवश्यक आहे. यामध्ये नियमित संवाद, सहानुभूती आणि समज यांचा समावेश होतो. संघर्ष आणि गैरसमज सुद्धा होतात, परंतु खरे मित्र या आव्हानांवर धैर्याने आणि तडजोडीने मात करतात. मैत्रीच्या सामर्थ्याची अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत चाचणी घेतली जाते, आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर बंध अधिक दृढ होऊ शकतात आणि नातेसंबंध वाढू शकतात.
भावनिक आणि वैयक्तिक लाभाव्यतिरिक्त मैत्री आपल्या सामाजिक कल्याणाकरीता देखील योगदान देते. ते समुदायाला आपलेपणाची भावना देते. ते मानसिक आरोग्य, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, सण, उत्सव यात सहकार्य करते त्यामुळे आनंद मिळतो. जीवन अधिक समृद्ध होते आणि चिरस्थायी आठवणी राहतात. मित्र अनेकदा विस्तारीत कुटुंब बनतात. समर्थन आणि सहवासाचे नेटवर्क तयार करतात.
अधिक विस्तृतपणे मैत्रीची व्याख्या म्हणजे सजिवा प्रती प्रेम आणि मित्रत्वाची भावना ठेवणे म्हणजे मैत्री आहे. शत्रुत्व किंवा द्वेष ठेवणारा साठी मंगल कामना करने म्हणजे मैत्री होय. वैरभाव पासुन पूर्णतः मुक्त असणे म्हणजे मैत्री होय. खऱ्या मित्राची महती सुख दुःखात साथ देणारे मित्रांची असते. संकटाच्या वेळी जो मदतीला उभा राहतो तोच खरा मित्र होय. एकंदरीत जगातील अनेक माणसांचा असा अनुभव आहे कि सुखात, आनंदात, आपल्या आजूबाजूला अनेक मित्र जमतात. पण आपल्या वाईट परिस्थितीत आपणाला कोणाचीही मदत मिळत नाही.
माणसामध्ये हिस्त्र पशू दडलेला आहे असे म्हणतात. त्याचे दर्शन होत असते. माणसामध्येच माणूस दडलेला आहे त्याचेही दर्शन होत असते. तेव्हा मैत्री भावनेने करुणा क्षमा शांतीने मात करता येते. म्हणजेच शत्रूला प्रेमाने जिंकून माफ करून मैत्री करून वैर संपवायचं असतं. मनात ठेऊन कुढत बसणे शरीरास हानीकारक आहे. रक्तदाब, मधुमेह याना आमंत्रण दिल्या सारखे होईल. विसरुन जावे. विसर्जन हे सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय आहे. बदल्याच्या भावनेमुळे शत्रुत्वाची मालिका तयार होते. तिचा शेवट कसा होईल हे लक्षात येऊनही बदल्याच्या आगीत धुमसत रहाणे योग्य नाही. कुणीतरी शहाणा होऊन, कमीपणा घेऊन ही मालिका खंडीत केली पाहिजे.
अहंकार
अहंकारी माणूस प्रेम करूच शकत नाही. अहंकार जितका प्रबळ असेल तितकं सर्व जग शत्रुवत वाटेल. माणूस जितका विनम्र असेल तितका सगळया जगाबद्दल मैत्रीचा प्रवाह त्याच्याकडून वाहू लागेल. मैत्री म्हणजे निरहंकारिता. मनातील आतला ‘मी’ चा भ्रम तुटेल तेव्हांच मैत्री जन्माला येईल आणि सक्रिय होईल. पण आपण हा भ्रम पोसतच राहातो, आणि आपण त्याला जितका पुष्ट करतो तितकी, त्यांला कुणी नष्ट करेल याची भिती वाढत जाते. जसजशी ही भिती वाढत जाते तसतशी आपण आपल्याभोवती भिंत उभी करतो. दुसऱ्यांना दूर ठेवतो. जवळ येऊ देत नाही. अहंकारानं भरलेला माणूस प्रेम करूच शकत नाही. कारण प्रेमात कुणाच्या तरी जवळ जावं लागतं. आपण जितके आपल्याजवळ आहोत तितकी जवळीक त्याच्याशी करावी लागते. म्हणून अहंकारी माणूस प्रेमाला घाबरतो. प्रेमापासून दूर पळतो. कारण प्रेम म्हणजे दुसऱ्याला आपल्याजवळ येऊ देणे होय.
भगवान बुद्धाची मैत्री
भगवान बुद्धांनी भिक्षूंना मैत्री बद्द्ल सांगितले की पशु पक्षाशी, मनुष्याशी आणि भिक्खूशी मैत्रिपूर्ण व्यवहार करणे सर्वाचा आदर सत्कार करणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. कधी कोणाला कठोर शब्द बोलू नये. प्रतिकूल परिस्थितीत संयम ठेवून काम करावे. धैर्य सोडू नये. मनात नेहमी चांगले विचार ठेवावे. भिक्खुनो मैत्रीची धारा नेहमी प्रवाहित असली पाहिजे. तुमचे मन पृथ्वी सारखे खंबीर असले पाहिजे, हवे प्रमाणे स्वच्छ असले पाहिजे, आणि नदी प्रमाणे गंभीर असले पाहिजे. तुमचे चित्त विचलित होता कामा नये. तुमची मैत्री विश्वा प्रमाणे व्यापक असली पाहिजे.
ई. सन. 2500 वर्षापूर्वीच भगवान गौतम बुद्धांनी मैत्रिभावने विषयी उपदेश केला आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मैत्री ही अगदी शुद्ध आणि उदात्त अशी मनाची अवस्था आहे, ती शांत आहे, शुद्ध आहे, सर्वांचे हित करणारी आहे, क्रोधावर मैत्री हाच हमखास उपाय आहे, जो सतत मैत्री भावना करतो, त्याला अकरा प्रकारचे फायदे होतात. मैत्रीभावनेचे आचरण करणारा सुखाने झोपतो, सुखाने झोपून उठतो, त्याला शांत झोप येते, त्याला एकाग्रता लाभते. त्याला वाईट स्वने पडत नाहीत, सज्जन सत्पुरुष त्याचे रक्षण करतात, इतर माणसेही त्याच्यावर प्रेम करतात. विषारी पदार्थाचा त्याच्यावर परिणाम होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. तो सर्वांगाने प्रसन्न राहतो, तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मृत्यूला सामोरे जाताना भयभीत न होता सुगती प्राप्त करतो.
मैत्री ही व्यक्तीच्या मनाची एक अवस्था आहे. तथागताने करुणेच्याही पलिकडे जाउन मैत्री सांगितली आहे. मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होवो अशी स्वत:च्या मनाची अवस्था होय. आपला शत्रू जरी असेल तरी त्याचे अकल्याण किंवा नुकसान होऊ नये अशी भावना असणे, इतरांबद्दल मनाची निर्मळता असणे, ‘भवतू सब्ब मंगलम’ हा मनाचा भाव सदैव असणे म्हणजे बुद्धाने सांगितलेली मैत्री होय.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण












