
भाऊ किंवा बहिणीचे पवित्र, नाजूक नाते असते. प्रत्येक नाते आपापल्या ठिकाणी मजबूत असते. भाऊ बहिणीचे नाते जन्मजात असते, राखी शब्दाशी जोडलेला एक शब्द म्हणजे सुरक्षा. जीवनात स्त्रीला सुरक्षाकवच आवश्यक असते, जो तीला संकट काळात मदत मार्गदर्शक ठरू शकते. भाऊ बहिणीचे हे सुरक्षा बंधन ही एक आपलेपणाची भावना असते. कोणाला मदत करणे, कोणाला काही देणे याला बंधन म्हणता येणार नाही. देणं हे मुक्तहस्ते असले पाहिजे. त्यात कोणताही स्वार्थ नसावा. जिथे बंधन असते तिथे ते तुटू पण शकते. धाग्याचे बंधन समजून घेणे आवश्यक आहे.
राखीचा धागा जरी नाजूक असला तरी तो एखाद्या मजबूत धातूपेक्षाही मजबूत असतो. याला मनाचे बंधन म्हणता येईल, अनेक भावांना बहिणी नसतात. अनेक बहिणींना भाऊ नसतात, त्यामुळे हे नाते बहिण भावाच्या पलीकडचे आहे. लग्नानंतर बहीण भाऊ दुर राहतात, पण त्यांच्या आठवणींचा ठेवा राखी श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा उजळून निघतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपले प्रेम दर्शविण्यासाठी भावा बहिणींसाठी हा सण मोलाचा ठरतो. तशा श्रावण पौर्णिमेला अनेक घटना घडल्या असतात.
रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रामुख्याने भाऊ आणि बहिणी मधल्या स्नेह आणि प्रेमाचे संवर्धन करणारा असतो. यानिमित्ताने भावाच्या हातावर बांधली जाणारी राखी ही त्या दोघांमधल्या स्नेहाचे प्रतीक असते. भारतात कुटुंब व्यवस्थेत नातेसंबंधांना अतिशय महत्त्व आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्वाभाविकपणे कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा विचार होई, आणि त्याला आपण या कुटुंबाचे तितकेच महत्त्वपूर्ण घटक आहोत, असे वाटून समाधान मिळेल अशी देखील त्यामागची एक सुंदर व्यवस्था पाहायला मिळते. भाऊ बहिण पुढे आपापल्या कुटुंबाचे प्रमुख होत असतात. आई वडिलांसोबत राहात असतांना जपला जाणारा एकमेकांविषयीचा आदरभाव किंवा एकमेकांना मदत करण्याचा स्नेहभाव एक व्यापक संस्कार म्हणून रुजवला जातो. म्हणजेच लहान वयापासूनच एकमेकांच्या जवाबदाऱ्या एकमेकांना मदत करण्याचे कर्तव्य असा एक विशेष संस्कार मनावर आपोआप ठसतो आणि ही भावना रक्षाबंधनासारख्या सणात दिसून येते. कुटुंब व्यवस्था टिकविणे महत्वाचे असते. कुटुंबामधला आदरभाव आणि विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे असते.
या रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक स्तरावरही जात, पंथ, भेद विसरून अनेक ठिकाणी संस्थांमध्ये एकमेकांना राखी बांधली जाते आणि आपापसातला बंधुभाव टिकवला जातो. आपल्याला मदत करणाऱ्या विषयीची कृतज्ञता किंवा आदर त्यातून व्यक्त होतो. या राखीलाच रक्षासूत्रही म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्या एकूणच आयुष्यात किंवा जीवनाच्या व्यवहारामध्ये आपले रक्षण करणाऱ्या प्रत्येक घटकाची जाणीव ठेवली जाते.
पुराण कथांमधून देवदेवतांनी याच संरक्षणाचा किंवा संस्कारांच्या संवर्धनाचा उपदेश केलेला पाहायला मिळतो. कोण किती मोठा आहे, कोणाकडे किती पैसा आहे. याबद्दलचा कोणताही अहंकार, गर्व, अभिमान मनामध्ये न ठेवता एकमेकांबरोबरचा एक स्वयंस्फूर्त सुसंवाद घडून आला पाहिजे तो होण्यासाठी काही ना काही उपक्रम आणि निमित्त आवश्यक ठरतात. ज्यावेळेला शेकडो वर्षांच्या या परंपरा इतक्या प्रामाणिकपणे आणि मन लावून पाळल्या जातात त्यावेळी त्यातला माणुसकीचा आणि सामाजिक व्यवस्थेचा विचार सर्वात आधी लक्षात घेतला पाहिजे. आपण हा सण का साजरा करतो आहोत. त्याचा मूळ हेतू समजून घेऊन त्यातला विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या पद्धतीने ही सामाजिक सभ्यता वाढवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जरी कुटुंब छोटी झाली असली तरी सोशल मिडीया वरूनही राखी पौर्णिमेच्या दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा हासुद्धा सामाजिक संदेश ठरतो. रक्षाबंधन हा हिंदूचा सण आहे
अनेक धर्मामध्ये रक्षाबंधन हा सण मानत नाही. रक्षाबंधन हा बहिण भावाचा सण नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार तो मनुवाद्याचा सण आहे. इतिहासावरून असे लक्षात येते की क्षत्रियांना हा धागा बांधण्यात येत होता. त्यांना ब्राम्हणांचे रक्षण करण्याची शपथ दिली जात होती. आजच्या दिवशी ब्राम्हण शुद्राच्या घरी जाऊन राखी बांधतात. ते जेव्हा शुद्राच्या घरी जातात, तेव्हा ते मंत्र वाचन करतात, त्या मंत्रात ते म्हणतात ज्याप्रमाणे तुमच्या बळीराजाला आमच्या ब्राम्हणांनी बंदी केले होते, अशाप्रकारे तुम्हाला मानसिकरित्या धागा बांधून बंदी करण्यात येते. याचा अर्थ आज पर्यंत जसे ठेवले तसेच रहा. हा धागा ज्या उद्देशाने बळीराजाला बांधण्यात आला होता त्याप्रमाणे तु बहुजन समाज आजपासून आमचा गुलाम आहे. त्यामुळे ब्राह्मणाचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे. आजपासून तुम्ही आम्हाला समर्पित झाला आहात. ते वचन तुम्ही मोडायचे नाही.
बळीराजा बहुजन समाजाचे सर्वात मोठे शक्तिशाली राजा होते. बळीराजाने ब्राम्हणांना संपूर्ण देशातून हाकलून दिले होते. देश ब्राम्हणमुक्त झाला होता. ब्राम्हणांचे सर्व उपाय व्यर्थ गेले म्हणून ब्राम्हणांनी नविन युक्ती शोधली. यज्ञ करण्याची चालाखी केली. बळीराजाला यज्ञ करण्याविषयी मान्य करण्यात आले. यज्ञानुसार दान देणे आणि प्रसन्न करणे आवश्यक असते. ब्राम्हण तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार दान मिळाले असते. ब्राम्हणामध्ये एक ब्राम्हण ‘वामन’ होता. त्याने बळीराजापासून तीन वचने घेतली, पहिल्या वचनानुसार बळीराजाचे जे दूरवर राज्य पसरले आहे, ती जमीन मागितली, दुसऱ्या वचनात समुद्र मागितला, जिथपर्यंत राजाची सत्ता होती, तिसऱ्या वचनात राजाचे डोके मागण्यात आले, ब्राम्हणाच्या गुलामीत सापडलेल्या बहुजन समाजाची स्थिती आजही बळीराजासारखी आहे. बळीराजाने बंधनसूत्र बांधल्यामुळे बळीराजावर ही पाळी आली. आज बहुजनांवर तीच पाळी आहे. तसे ब्राम्हण साम, दाम, दंड, भेदाचा वापर करीतच करतो.
ब्राम्हणांना शूद्राचा स्पर्श चालत नाही, त्यांचे दान मात्र चालते. ब्राम्हणाच्या गुलामीत सापडलेला बहुजन समाज आजही सर्वकाही ब्राम्हणांना देत आहे. लुटणाऱ्यांचा धर्म असू शकत नाही. आजपर्यंत कोणत्याही सणाचा मूळनिवासी बहुजनांना फायदा झाला नाही. ब्राम्हणांचे रितीरिवाज, प्रथा, परंपरा, कर्मकांड हा बहुजनांचा धर्म नाही. मनुवादी धार्मिक परंपरा ही बहुजनांची गुलामी आहे. विदेशामध्ये रक्षाबंधनासारखे सण मानल्या जात नाही. ब्राम्हण म्हणतात रक्षाबंधनाची राखी न बांधल्यास नुकसान होते, परंतु आजपर्यंत जगाच्या इतिहासात कोणत्याही देशात नुकसान झाले नाही. नुकसान हे फक्त भारतातच मानल्या जाते. अशा प्रथा, रूढी परंपरा जर ब्राम्हणाच्या तुटल्या तर त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
रक्षाबंधन बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक नाही. बहिणीने भावाला राखी बांधावी याचा काही अर्थबोध होत नाही. शेतकऱ्यांना सुद्धा बळीराजा म्हटले जाते. बळीराजाच्या राज्यात देशात सोन्याचा धूर निघत होता. शेतकरी आजही बैलाची पूजा करतात आणि म्हणतात, ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’ बळीराजा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा राजा होता. रक्षाबंधन रक्षणाचे बंधन म्हणजेच गुलामीचे बंधन. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक यांनी आपली बहीण बेबे नानकी हिला राखी बांधण्यास मनाई केली होती. गुरुनानक म्हणतात बहिणीने रक्षा करण्यासाठी भावावर अवलंबून राहू नये. महात्मा फुले म्हणतात आध्यात्मिक गुलामीमुळे मानसिक गुलामी आली आहे. मानसिक गुलामीमुळे विचार करण्याची शक्ती कमी झाली. मानसिक गुलामीमुळे आर्थिक गुलामी आली. बहुजन समाज ब्राम्हणांचा मानसिक गुलाम बनला आहे. बंधन सूत्र बांधण्यासाठी ब्राम्हण दान घेतात, तेच दान ते राजकीय पक्षांना देतात, ते वाममार्गाचा अवलंब करून निवडून येऊन बहुजनांच्या गुलामीसाठी रणनीती बनवितात. बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन समाज रक्षाबंधन सण मानत नाही.
धागा हा गुलामाला बांधण्यात येते. जसे जनावरांना नियंत्रित करण्यासाठी दोराने बांधण्यात येते. ज्याच्या हातात दोरा बांधलेला असतो तो ब्राम्हणांचा मानसिक गुलाम असतो. ब्राम्हणांना विचारल्याशिवाय तो काही करू शकत नाही. धागा भावाचे रक्षण करतो की बहिणीचे? ज्या बहिणीला भाऊ नाही तीचे रक्षण कोण करील? जर बहिण मोठी असेल आणि भाऊ लहान असेल तर तिचे रक्षण कोण करील? हे अधिकार आता संविधानाने दिले आहेत. भाऊ बहिणीचे नाते हे प्रेम आणि आपुलकीचे नाते आहे. धागा बांधणे याला काही अर्थ नाही. विदेशामध्ये कोणतीही बहिण आपल्या भावाला राखी बांधत नाही. प्रत्येक जण आपापसात प्रेमाने राहतो. धागा बांधण्याच्या निमित्ताने बळीराजा कडून तीन अधिकार शिक्षण, शस्त्र, संपत्ती हिसकावून घेतले. कपाळावरील टीका ही गुलामगिरीची ओळख आहे.
*श्रावण पौर्णिमा*
बौध्द धम्मात रक्षाबंधनाला महत्व नाही पण सर्व पौर्णिमेला फार महत्व आहे. त्यापैकी एक म्हणजे श्रावण पौर्णिमा होय. श्रावण पौर्णिमेला चार महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.
1. तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालास धम्मदीक्षा दिली.
2. सुदत्ताने म्हणजेच अनाथपिंडकाने 160 बुध्दसुत्त मुखोत्गत सांगितले.
3. प्रथम धम्म संगीती, ही संगीती तथागत भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्या नंतर प्रथम श्रावण पौर्णिमेलाच झाली.
4. शून्यवादी महान आचार्य नागार्जुन यांची जयंती. अशा चार घटना श्रावण पौर्णिमेला बौध्द धम्मात घडल्या.
भारत देशातील पुरुषप्रधान समाजरचनेने धर्मशास्त्रांचा, पुराणांचा, मनुस्मृतीचा दाखला देऊन स्त्रियांचे हजारो वर्षा पासुन हक्क व अधिकार नाकारले. ते सर्व हक्क व अधिकार हिंदू कोड बिलाने समस्त भारतीय स्त्रीयांना दिले आहेत. अनेक तऱ्हेचे मुलभुत अधिकार स्त्रीयांना मिळवून देऊन संपुर्ण भारतीय स्त्रीयांच्या सर्वांगीण विकासाचा, प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग मोकळा करुन दिला. स्त्री ही पुरुषा प्रमाणेच एक पुर्ण व्यक्ती आहे. हे सिध्द केले.
भारतीय स्री मुक्तीची खरी तळमळ फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनाच होती, म्हणुनच जीवाचे रान करुन संसदेत हिंदू कोड बिल मांडले. परंतु मनुवादी सरकार असल्यामुळे हे बिल नाकारण्यात आले. हे बिल पास न झाल्यामुळे अखेर बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात टप्प्या टप्प्याने हे बिल पास झाले. हिंदू कोड बिलामुळे समस्त भारतीय स्त्रियांच्या विकासाच्या, प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे हे कोणीही नाकारु शकत नाही. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातुन समस्त भारतीय स्त्रीयांना स्वाभिमान वाटेल असे प्रावधान करुन दिले आहेत. असे म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगती मागे फक्त एकच महापुरुषाचा हात आहे, आणि ते म्हणजे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण














