
नारळी पुनवेचा दिन
करू साजरे रक्षाबंधन
श्रावण सरीनी भिजले
माहेरच्या वाटेवरी मन
आली स्नेहांकित होवून
रेशीम बंध घेवून बहीण
लावी मांगल्याचा दीप
प्रेमे करीतसे औक्षण
गोड मिठाईचा घास
भाऊराया भरविते
सुखी ठेव माझ्या भावा
ईश्वरास विनविते
देतो ओवाळणी भाऊ
करी खिसा मोकळा
बहिणीच्या प्रेमापोटी
त्याचा दाटतो गळा
भरी नणंदेची ओटी
वहिनी प्रेमभराने
पंगतीला वाढी माय
नारळीभात आग्रहाने
माहेरवाशीण सुखाने
घेते प्रेमाची शिदोरी
वाट चालते सासरची
ओढ घेते मन माघारी
सौ. वंदना शशिकांत पाटील















