
वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत असतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही मनात सतत वाढतात आणि दाट होत जातात. पारंब्या झाडाला आधार देतात, तसेच आठवणी आपल्याला भूतकाळाशी जोडून ठेवतात. त्या आपल्याला जगण्याचा अर्थ सांगतात, आणि भविष्यासाठी मार्गदर्शन करतात.
विचार हा सूक्ष्म असतो. विचाराचं बीज मनात पडतं आणि त्यातून जो वृक्ष निर्माण होतो त्याला चिंतनाच्या पारंब्या फुटतात. त्या पारंब्यांवरून कधी झोके घेता येतात.. कधी विचारांचा प्रवाह अधिक गतिमान होतो. आपल्या अंतर्मनातला सूक्ष्म विचार जागा करणं आणि विचारांच्या पारंब्यांवरून झोके घेत नवप्रेरणांनी मन अधिक उत्साही ठेवता येते.
आठवणींच्या या माध्यमातून बालपणीच्या जगाची सफर घडवतो. लहानपणीच्या निरागस आठवणी, निसर्गाशी असलेली जवळीक, आणि त्यातून मिळणारा आनंद यांना “पारंब्या” हा शब्द आठवणींच्या धाग्यांशी जोडतो. पारंब्या एकमेकांना धरून वाढतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही एकमेकांना धरून असतात. एका आठवणीमुळे दुसरी आठवण, आणि त्यातून तिसरी आठवण अशी आठवणींची साखळी तयार होते. जणू काही बालपणीच्या आठवणींच्या पारंब्या आजही आपल्या मनात रुतून बसल्या आहेत, ज्या आपल्याला भूतकाळाशी जोडतात.
प्रत्येक आठवण तिच्यासोबत भावना घेऊन येते. काही आठवणी आपल्याला हसवतात, तर काही रडवतात. काही आठवणी आपल्याला प्रेरणा देतात, तर काही आपल्याला निराश करतात. आजच्या परिस्थितीत आपण आपल्या चांगल्या आठवणींना उजाळा देऊन सकारात्मक राहू शकतो, आणि वाईट आठवणींवर मात करून पुढे जाऊ शकतो.
सौ. अंजली जोशी
चिंचवड














