
घरातील भिंतीवरील मजकुरामुळे तपासाला नवा धागा
नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील रहिवासी दिलीप मिजगुले यांनी प्रथम पत्नी स्वाती मिजगुले यांना मारहाण करून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. स्वाती मिजगुले या अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांच्या निधनाने गावातील महिला वर्ग भावूक होऊन रडू लागला आणि वातावरण शोकमग्न झाले.
सकाळपासून मिजगुले दांपत्यांचा दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शंका आल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावले असता दिलीप मिजगुले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी स्वाती मिजगुले या खाली जखमी मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. या प्रकारामुळे शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले.
दरम्यान, कोपरगाव तालुका पोलिसांनी व शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता स्वाती मिजगुले ह्या मृत अवस्थेत आढळल्या, तर दिलीप मिजगुले गळफास घेतलेल्या मृतावस्थेत होते. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने चासनळी गावात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणात अधिक धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या तपासादरम्यान घरातील भिंतीवर काही मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. आत्महत्येपूर्वी दिलीप मिजगुळे यांनी स्वतःच्या हाताने हा मजकूर लिहिल्याचा संशय आहे. मात्र नेमके काय लिहिले गेले आहे, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू असून भिंतीवरील मजकुरातून घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वाती मिजगुले या अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच महिला वर्गाची मोठी गर्दी घराबाहेर जमली होती. स्वातींच्या आठवणी सांगताना अनेक महिला भावूक झाल्या आणि डोळ्यांतून अश्रू धारा वाहत होत्या. स्वाती मिजगुले या शांत, सेवाभावी व मुलांवर माया करणाऱ्या सेविका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घरगुती कलह होता की इतर काही कारण, याचा तपास सुरू आहे. भिंतीवर लिहिलेल्या मजकुरामुळे तपासाला नवा धागा मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चासनळी गाव शोकसागरात बुडाले आहे.












