prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांनी व मदरसांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा :...

जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांनी व मदरसांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

0
97

वाशिम – दि. १२ सप्टेंबर : वाशिम जिल्ह्यात १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरसांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतीदलाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विभाग, समाजकल्याण विभाग तसेच स्थानिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांतील आश्रमशाळांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यामुळे आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत पात्र सर्व विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीचा एक अतिरिक्त डोस दिला जाणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर व रुबेला रोगांचे निर्मूलन करणे, लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त करणे आणि दोन्ही डोस घेतलेल्या मुलांमध्ये ड्रॉपआउट दर शून्य करणे ही प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
लसीकरणानंतर होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांनी लसीकरणानंतर किमान ३० मिनिटे लसीकरण केंद्रावर थांबणे आणि त्यानंतर पुढील २४ तास त्यांचेवर निरीक्षण ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक लसीकरण सत्रासाठी सहा सदस्यीय पथक नेमले जाणार असून, लसीकरणाची माहिती दररोज तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सादर करावी लागेल. पालकांची संमती घेणे, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच जनजागृती उपक्रमांवर विशेष भर दिला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी मोहिमेत आश्रमशाळा व मदरसांचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगून, समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी सर्वांनी या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here