
भाकपाच्या जनसंघर्षामुळे हालचाली, मंजुरीपर्यंत लढा सुरूच
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील भाकपाच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर सुरजागड गट्टा रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. तलोधी – आमगाव – देवारी – भाडभिडी – रेगाडी – देवडा – बोलेपल्ली – एटापल्ली – परसलगोंदी – गट्टा रस्ता (राज्य महामार्ग क्र. ३८१) ९२/७०० ते ९७/४०० किलोमीटर पर्यंतचा भाग नवीन डांबरीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आला असून, यासाठी ७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा खनिज निधी योजनेंतर्गत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून, प्रवास करताना विद्यार्थी, शेतकरी, महिला, दैनिक प्रवासी ,आदिवासी जनता व रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर वारंवार निवेदने, आंदोलन व निदर्शने होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती.
या संदर्भात अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, गडचिरोली यांनी लेखी पत्र पाठवून भाकपा जिल्हा सहसचिव तथा एआयवायएफ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांना माहिती दिली आहे. पत्रात अंदाजपत्रक शासनाकडे पाठविल्याचे व मंजुरी मिळताच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भाकपाने या हालचालीचे स्वागत करताना म्हटले आहे की – “जोपर्यंत रस्त्याचे बांधकाम मंजूर होत नाही तोपर्यंत भाकपा या प्रश्नावर सतत पाठपुरावा करत राहील. रस्त्यासाठी बनवलेले अंदाजपत्रक तातडीने मंजूर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आता आंदोलन उभारणार आहोत. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली कार्यालय समोर भाकपा जोरदार धरणे आंदोलन छेडणार आहे.”
भाकपाने पुढे जाहीर केले की – “आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खदानांपर्यंत रस्ता बनवायला वेळ आणि पैसा आहे; पण जनतेला हक्काने पाहिजे असलेला गट्टा रस्ता मात्र सतत दुर्लक्षित राहिला आहे. हा दुटप्पीपणा आम्ही सहन करणार नाही. जनता डांबरी रस्त्याची मागणी करत आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत भाकपाचा संघर्ष अखंड सुरू राहील.”
स्थानिक जनतेने या भूमिकेचे स्वागत केले असून, “संघर्षाशिवाय हक्क मिळत नाही” या घोषणेसह रस्त्याच्या प्रश्नावरचा जनआंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे.















