
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर गावगुंडांनी केलेला जीवघेणा हल्ला हा लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह प्रकार आहे. पार्किंग पावतीच्या किरकोळ वादावरून पत्रकारांना थेट जीवावर उठणे ही गंभीर बाब असून यामधून महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची बिकट अवस्था स्पष्ट दिसून येते.
गेल्या काही वर्षांत वारंवार पत्रकारांवर हल्ले होत आहेत, मात्र सरकारकडून अद्याप ठोस आणि कठोर कारवाई झालेली नाही. गुन्हेगारांना वेळोवेळी राजकीय अभय मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल वाढलेले आहे आणि त्याचेच हे दुर्दैवी परिणाम आज आपण पाहत आहोत.
आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभाग प्रमुख प्रशांत कांबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी पावले उचलून दोषींवर उदाहरणार्थ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येत आहे.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे. अशा घटनांना सरकारने तातडीने आळा घालून पत्रकारांचा विश्वास जपणे हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे.















