prabodhini news logo
Home ठळक बातम्या रा.से.यो. म्हणजे सक्रीय तरुणांचे ऊर्जा केंद्र – डॉ. जयंतकुमार मस्के

रा.से.यो. म्हणजे सक्रीय तरुणांचे ऊर्जा केंद्र – डॉ. जयंतकुमार मस्के

0
137

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

( भंडारा ) – राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम खऱ्या अर्थाने सक्रीय तरुण विद्यार्थ्यांचे ऊर्जा केंद्र आहे.” असे प्रतिपादन डॉ.जयंतकुमार मस्के यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर येथे नुकताच राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राधेश्याम दिपटे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कला शाखा प्रभारी डॉ. जयंतकुमार मस्के व डॉ. भारती काटेखाये हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयंतकुमार मस्के म्हणाले की, ‘राष्ट्रीय सेवा योजना ही आजच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाची संधी आहे. तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा असते. या ऊर्जेला सकारात्मक सहकार्याची व सामाजिक बांधिलकीची दिशा देण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आहे.’ आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राधेश्याम दिपटे म्हणाले की, ‘राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा मिळते. त्यांचे आचार विचार घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रीयतेने सहभाग घ्यावा.’ याप्रसंगी डॉ. भारती काटेखाये यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देश व स्वरूपावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना या विभागांतर्फे महाविद्यालय परिसर स्वच्छतेचे कार्य करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, स्त्री पुरुष समानता असे अनेक विषय रांगोळी स्पर्धेसाठी देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. पूजा मलेवार आणि समूह यांना तर द्वितीय क्रमांक कु रोशनी ठाकरे आणि समूह यांना देण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. छानू शेंडे आणि समूह यांना तर द्वितीय क्रमांक कु. किरण देशमुख आणि समूह यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेश दिपटे यांनी केले. सूत्रसंचालन राज ठवकर या विद्यार्थ्याने केले तर आभार प्रदर्शन रोहन उपरीकर या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमात डॉ. गोल्डी बघमार, रेणुकादास उबाळे, डॉ. अरुणा बावनकर, डॉ. सुनिता राठोड, डॉ.व्यंकटेश मोरे, डॉ. पूनम ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here