
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जनतानगर झोपडपट्टीतील बी.एस.यु.पी. (Basic Services for Urban Poor) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुलांची चावी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालत आवश्यक ती पावले उचलली आहेत.
मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका आणि गृहनिर्माण विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पात्र नागरिकांना तातडीने घरे द्यावीत. योजनेअंतर्गत काही घरे खोट्या लाभार्थ्यांच्या नावे वाटप झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा बनावट प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, पात्र नागरिकांची खरी यादी निश्चित करण्यासाठी एका महिन्याच्या आत बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भात बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, “मीरा-भाईंदरकरांच्या घरकुल प्रश्नावर तोडगा काढणे हीच माझी प्राथमिकता आहे. बी.एस.यु.पी. योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना सुरक्षित व कायमस्वरूपी घरे देऊन त्यांचे स्वप्न साकार करणार आहोत.”
या निर्णयामुळे मीरा-भाईंदरमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.















