
प्रा. डॉ. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – समाज जीवनातील विविध कंगोरे अनुभवत, दाहक वास्तवाला सामोरे जाताना अन्याय, अत्याचार विरुद्ध वाचा फोडत आवाज बुलंद करणारा विषमते विरुद्धचा एल्गार म्हणजेच एफ.डब्ल्यू . खोब्रागडे यांचा लेबल हा काव्यसंग्रह होय. हा कलावंत कवी संवेदनशील तर आहेच आणि व्यवसायाने राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असून दैनंदिन जीवनात भेटणारी अनेक माणसे, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीची नोंद तो कवितेतून करतो. सर्जनशील कलावंत कवी, धर्मचिकित्सक, आत्मशोधक एफ .डब्ल्यू कोब्रागडे यांनी 96 कवितेच्या गुच्छातून इतिहासाची कठोर चिकित्सा, वर्तमान वास्तव प्रखरपणे अधोरेखित करत मर्मस्पर्शीपणे भविष्याचा वेध घेतलेला आहे. जातीचे भयंकर वास्तव कवीने निदर्शनास आणून देत ते बदलण्यासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी फुले ,शाहू ,आंबेडकरांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. किंबहुना वर्तमान समस्यांची उत्तरेही याच विचारसरणीत निश्चितच सापडतील हा कवीचा बाणा सार्थ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असावे असा विचार दिला. त्याच वैचारिकतेशी निष्ठा आणि नाते सांगणारा हा कवी विविध कवितांमधून समाजाला वास्तविकतेची जाणीव करून देत डोळस बनवत परिवर्तनसंन्मुख व्हायला प्रवृत्त करतो. सभोवतालचे विदारक वास्तव स्पष्ट करताना अन्याय, शोषण, अंधश्रद्धा ,जाती व्यवस्था याविरुद्ध आक्रंदन अभिव्यक्त करतो.
‘ माणूस श्रेष्ठ की धर्मास मानावे श्रेष्ठ ,न उमगलेलं कोडं सोडवत राहिलो मी ,माझ्यातले आता मी हरवले माणूसपण, धर्मा केवढा तुला गोंजारत आलो मी”अशा शब्दातून कवी धर्मचिकित्सा करतो. आणि समाजात जातीय, धार्मिक अस्मितेतून उद्भवणाऱ्या दंगली या घातक असल्याचे स्पष्ट करतो. एकूण मानवी विविधतेचा शोध घेणारी गांडू , खांदा कविता, अन्यायकारक गोष्टीला जुगारून देत विद्रोह पेरणारी बडगा ही कविता, स्वार्थासाठी विखुरलेल्या नेतृत्वातील फितूरशाही दर्शविणारी फितूर कविता , आडनाव आणि जात याचं समीकरण गुंतागुंतीचे असल्याचे सूचविणारी गुंता आणि जात या कविता महत्त्वपूर्ण आहेत. सामाजिक वास्तव स्वार्थी मनोवृत्तीच्या माणसांमुळे बिघडत चाललेले आहे. जात आणि धर्माच्या चिखलात खोलवर रुतलेली मानसिकता कवीला अस्वस्थ करते. समता ,बंधुता, न्याय या मानवी मुद्द्याच्या प्रस्थापनेसाठी पुढारलेला कवी विविध जाणीवांचा गंभीरपणे शोध घेतो आणि विदारकते विषयी आगडोंब पाखडतो.
“पुनश्च एकदा सतयुग आणून आमच्या कपाळावर लेबल मारू पाहतात ,त्याच जातीयवाद्यांची पिल्लावळ लेबल मारण्यासाठी सरसावलेल्या, तो हात वेळीच छाटला पाहिजे” अशा सजगतेचा इशारा देणारी ही शीर्षक कविता वाचकाला अंतर्मुख करीत हादविणारी आहे. अमानुषपणे होणाऱ्या अत्याचाराने पीडित असलेल्या समाजावर,विपरीततेचे लेबल माथ्यावर मारून स्वतःची पोळी शेकणाऱ्या कुपमंडित, अपप्रवृत्तीच्या विरोधात कवी आवाज बुलंद करतो.जात, धर्म यामुळे आता गावागावात जातीय व त्याचा वनवा जोमात पेटल्यामुळे स्वधर्माविषयीचा अहगंड बाळगून परधर्मावर आक्रमण ,अत्याचार करण्याच्या विकृतीवर प्रहार करतो. जात, धर्म यापेक्षाही माणूस श्रेष्ठ असल्यामुळे “मंदिर नि मस्सीदीत येणारा असतो माणूस, माणसात शोधावी माणूसकी ‘ हा आशय मांडत मानव्यत्वाची भूमिका स्पष्ट करतो.
समाजातील फितूरशाही चव्हाट्यावर मांडत निष्ठा बाजूला सोडून स्वार्थासाठी दिशा बदलवत कोणताही मार्ग निवडणाऱ्या फितुराचा खरपूस समाचार कवी कवितेतून घेतो.” आज कुणी दलाल, चमचे ,लाचार, फितूर झाले अन् तुमचे स्वप्न धुळीस मिळाले ” अशा ओळीतून एकंदर स्थितीचा आत्मशोध घेत कवी समाजाला जागृकतेचा इशाराही देतो.” षंढ बनुन जगायचे असेल तर गुलामी तुला लखलाभअसो ,मी मात्र गुलामी आणि अन्यायाविरुद्ध बंड पुकारणार आहे.”अशा प्रकारे एफ डब्ल्यू खोब्रागडे यांची कविता बंड रुजविणारी आहे. संघर्षसिद्ध होण्यास प्रेरित करणारी कविता आहे. सामाजिक वास्तव अधोरेखित करताना कवीला पडलेले प्रश्न हे अंतर्मुख करणारे आहेत. जातीयवादाच्या दंगलीत मरणाऱ्यांचे मित्रा सांग मला, किती रजावे अजून सरण? कधी मिळणार हो पेन आणि पाटी? अंगठी का छाटले? साहेब, गुलामी आणि विद्रोह म्हणजे काय जी? अशा प्रश्नातमकतेतून कवी वाचकासही विचारप्रवृत्त करतो. लेबल या सर्वसमावेशक स्वरूपांच्या संग्रहातील कवितातून भूतकाळाचा शोध, वर्तमानाचे अंकन आणि भविष्यवेध कवीने तटस्थपणे घेतला आहे.सामाजिक भावविश्व मर्मस्पर्शीपणे रेखाटणाऱ्या लेबल संग्रहात गुलामगिरी, जातीयता,वेठबिगारी, स्त्री अत्याचार, राजकारण, शोषण, दुरावलेपण,फितुरशाही या विषयावरील आशयसंपन्न कविता वास्तविकता प्रत्ययकारीपणे अधोरेखित करणाऱ्या आहेत.
विलक्षण भावविश्व रेखाटणाऱ्या एफ. डब्लयू.खोब्रागडे या कवींची तीव्र संवेदनशीलता ,सामाजिक बांधिलकी, वेदना, अंतरिक तळमळ ,प्रामाणिक निष्ठा, स्वाभाविक भाषाभिव्यक्ती, विषमता नष्टतेसाठी धडपडणारी संघर्षप्रेरित समाजदृष्टी, प्रश्नात्मकता आणि प्रबोधनात्मक धडपड हे विशेष या लेबल संग्रहातील कवितातून प्रकर्षाने जाणवतात. तद्वतच उपरोधिकता हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
लय आणि तालाचे भान असणाऱ्या या कवींच्या बहुतांश कविता मुक्तछंदातील आहेत .सूर्य सारखी अभंगसदृश्य कविताही आशयसंपन्न आहे.
एकंदरीत लेबल या कवितासंग्रहातून एफ डब्ल्यू खोब्रागडे यांनी समतेचा पुरस्कार, अपप्रवृत्तींचा निषेध, स्व समाजबांधवास माणुसकीच्या शिकवणीने सजग करीत दुष्टतेच्या धिक्काराने निषेध नोंदविलेला आहे. आत्मचिंतनाने विचार प्रवृत्त करणाऱ्या या कवितेतून अन्याय, शोषणाविरुद्ध बंड पुकारलेला आहे. विषमतेविरुद्धचा आवाज बुलंद करणारी एफ. डब्ल्यू. खोब्रागडे यांची कविता केवळ प्रश्नच मांडणारी नसून त्या प्रश्नांची उत्तरे फुले, शाहू ,आंबेडकरांच्या विचारात असल्याचे दिशादर्शन करणारी आहे. बहुजन साहित्य प्रसार केंद्र नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या लेबल या वाचनीय कवितासंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इसादास भडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना, आशयसूचक, मार्मिक, काव्यार्थ सुचित करणारे मुखपृष्ठ ज्येष्ठ छायाचित्रकार सुदर्शन बारापात्रे याचे असून त्यामुळे संग्रह आकर्षक बनला आहे.















