prabodhini news logo
Home आरमोरी साहित्यिका सुनिता तागवान यांच्या ‘वारे जागृतीचे’ या काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन

साहित्यिका सुनिता तागवान यांच्या ‘वारे जागृतीचे’ या काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन

0
123

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दोन दिवसीय तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन पाच ऑक्टोबर व सहा ऑक्टोबर २०२५ ला अमरावती येथील कांचन रिसार्ट येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. तळागाळातील विदर्भातील लेखिकांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला व्हावा यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन ‘माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर ‘ च्या वतीने करण्यात आले होते. या संमेलनाचे आयोजन व नियोजन सुप्रसिद्ध साहित्यिका विजया मारोतकर यांनी केले होते.
या दोन दिवसीय दमदार संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उषाकिरण आत्राम ह्या होत्या. यावेळी विदर्भातील लेखिकांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी स्थित कवयित्री व लेखिका सौ.सुनिता आनंद तागवान यांच्या ‘वारे जागृतीचे’ या मराठी काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर संमेलनाध्यक्षा सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिका डॉ. उषाकिरण आत्राम, आयोजिका व साहित्यिका विजया मारोतकर, आयुर्वेदाचार्य डॉ. मनीषा यमसनवार, कवयित्री कांचन उल्हे, लेखिका ज्योत्स्ना चांदगुडे , विजया ब्राम्हणकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सन्मानपत्र व एक रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात ‘नाही तर तू इथून चालता हो’ या कवितेच्या सादरीकरणासाठी त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
कवयित्री लेखिका सुनिता तागवान यांचा ‘वारे जागृतीचे’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात समाजातील वास्तविक परिस्थितीवर आधारित असलेल्या कवितांतून अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. समाजात चांगल्या विचारांची पेरणी व्हावी या दृष्टीने लिहिलेल्या कवितांचा या संग्रहात समावेश आहे. या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक बाबाराव मडावी आकांतकार यवतमाळ यांनी प्रस्तावना दिली आहे तर प्रसिद्ध प्रबोधनकार प्रा.डॉ.शिलवंतकुमार मडामे भंडारा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुनिता तागवान या विविध वर्तमान पत्रांतून, इ वृत्तपत्रांतून , न्यूज पोर्टल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती मासिक पत्रिका तसेच विविध माध्यमांतून अनेक ज्वलंत विषयावर कविता,लेख व कथा लिहीत असतात.
या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी सुनिता तागवान यांचे बाबाराव मडावी, डॉ. शिलवंतकुमार मडामे, वैशाली सुर्यवंशी नाशिक, देविदास गायकवाड, सुजाता उके नागपूर, संगीता बोरकर, माला मेश्राम नवी मुंबई सुभाष मानवटकर नागपूर, उपेंद्र रोहणकर, विठ्ठलराव कोठारे, प्रा.नानाजी रामटेके आरमोरी, डॉ .भाग्येश तागवान, ॲड. गुंजन तागवान, डॉ. आनंद तागवान आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांचेसह सर्वच स्तरातून भरभरून अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here