
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मिरा रोड: मिरा-भाईंदर शहरातील जनतेला दिलेल्या विकासाच्या वचनांची पूर्तता करत, मा. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्हा पालकमंत्री, यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून “स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क” चे लोकार्पण आज मंगळवार, ०९ सप्टेंबर २०२५ रोजी स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या कुटुंबीयांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत मिरा रोड पूर्व भागातील आरक्षण क्र. २५६ या जागेवर उभारण्यात आलेल्या या पार्कला स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने नामकरण करण्यात आले. मंत्री सरनाईक यांनी या प्रस्तावाचे पाठपुरावा करून महानगरपालिकेकडून शिक्कमोर्तब नोंद घेतली. स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांनी परिसराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन हे नामकरण करण्यात आले, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
पार्कमध्ये लहान मुलांसाठी प्ले एरिया, कमांडो वॉल, क्लायमिंग वॉल, स्विमिंग ब्रिज आणि वेगवेगळे टर्नल्स यासह बसण्यासाठी विश्रांतीचे एरिया तयार केले आहे. तसेच पार्कमध्ये वाहतुकीसंबंधित सांकेतिक खुणा आणि चिन्हे लावून मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मंत्री सरनाईक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले,
“स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांनी मिरा-भाईंदरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. समाजकारण आणि लोकहिताचे कार्य त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे केले. त्यांच्या नावाने या ट्राफिक पार्कचे नामकरण ही त्यांच्या कार्याला योग्य आदरांजली आहे. लहान मुलांना बालपणापासूनच वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या पार्कद्वारे मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त, जनजागृती व सुरक्षिततेची संस्कृती रुजेल, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
हा ट्राफिक पार्क केवळ मुलांना शिक्षित करण्यापुरता नाही तर संपूर्ण कुटुंबांसाठी मनोरंजन आणि माहितीचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने स्थानिक जनप्रतिनिधींनी या पार्काच्या माध्यमातून शहरातील सुरक्षित वाहतूक आणि सार्वजनिक जागरूकतेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.















