
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने तत्काळ बंदीचा आदेश
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissporta@gmail.com
मीरा-भाईंदर – मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर परिसरात चालणाऱ्या रेडी मिक्स कॉंक्रिट (RMC) प्लांटवर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर कारवाई केली आहे.
परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने झालेल्या पत्रव्यवहारानंतर, MPCB ने या प्लांटवर तत्काळ बंदीचा आदेश जारी केला आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर ११ सप्टेंबर रोजी MPCB ने स्थळाची पाहणी केली.
प्लांट झाकलेला नसल्याने धूळ उडत असल्याचे, पाणी शिंपडणी व सांडपाणी व्यवस्थापनाची कोणतीही सोय नसल्याचे आढळले.
नियमांप्रमाणे ३० फूट बॅरिकेडऐवजी फक्त १० फूट टिनची भिंत उभारण्यात आली होती.
वायू गुणवत्तेचे निरीक्षण यंत्र (CAAQMS) MPCB सर्व्हरशी जोडलेले नव्हते.
या सर्व गंभीर त्रुटींमुळे परिसरात धूळ व वायूप्रदूषण वाढले — नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.
MPCB ने पुढील कायद्यांअंतर्गत कारवाई केली आहे :
1 पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1974 – कलम 33A
2 हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1981 – कलम 31A
3 धोकादायक व इतर कचरा (व्यवस्थापन व सीमा पार हालचाल) नियम, 2016
संबंधित RMC युनिटविरुद्ध तात्काळ बंदी आदेश जारी करून वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेश न पाळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर सहा RMC प्लांट्सवर कारवाईची शक्यता
घोडबंदर परिसरातील लाईम स्टोन, ग्रास सिमेंट्स, सोनम बिल्डर्स, हिरकॉन इन्फ्रा, राज ट्रान्सिट इन्फ्रा, JVI अॅडव्हान्स टेक्निकल LLP या सहा प्लांटविरुद्ध नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्व ठिकाणी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले :
“मीरा-भाईंदरच्या नागरिकांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड होऊ देणार नाही. मी स्वतः पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी पाठवल्या होत्या. त्यानंतर MPCB ने तपासणी करून तत्काळ बंदीचा आदेश दिलाvu आहे.
ही फक्त सुरुवात आहे — शहरातील सर्व प्रदूषण करणाऱ्या युनिट्सविरुद्ध कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई होईल.”
या कारवाईमुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ही कारवाई महत्वाची ठरली आहे.















