
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 15 ऑक्टो. : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान, मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे वैशिष्ठ म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, बहुजन समाज पार्टी, दलित पॅन्थर, भारतीय बौधमहासभा, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी,
शिवसेना आदि.पक्षातील बौद्ध नेते, भिक्कू संघ, आमदार, खासदार सर्व मोर्चात एकजुटीने सहभागी झाले होते.

मोर्चा नंतर आझाद मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभेला संबोधित करतांना ना. रामदास आठवले म्हणाले की, 14 ऑक्टोबर हा महत्वाचा दिवस,आहे. हा बौद्ध नेत्यांचा एकजुटीचा मोर्चा आहे. या मोर्चात ऍड.बाळासाहेबांनी यायला हवे होते. मी मंत्री असलो काय नसलो काय, मी चळवळीतील एक कार्यकर्ता आहे. महाबोधी विहारात हिंदू धर्माची पूजा होते हे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा. सरकार कुठलेही असो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असे आठवले म्हणाले.
माजी मंत्री, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, बिहार सरकारचा टेम्पल ऍक्ट 1949 च्या कायद्यानुसार कमिटी मध्ये 9 सदस्य असून या पैकी 4 हिंदू, 4 बौद्ध, एक गयेचा कलेक्टर तोही हिंदू असावा म्हणजे मेजॉरिटी हिंदुची. यामुळेच बुद्धविहारात शिवलिंग ठेवण्यात आले आहे. बोधिवृक्षासमोर हिंदू देवतांच्या मुर्त्या ठेवण्याची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. तेव्हा सर्व 9 सदस्य बौध्द असले पाहिजे असे प्रतिपादान हंडोरे यांनी केले.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिली आहे. बिहारचा बी टी ऍक्ट 1949 कायदा आता जगाला कळाला आहे. 1950 ला संविधान लागू झाले. संविधानाच्या 13 व्या कालमानुसार राज्य घटनेशी विसंगत कायदे रद्द होतील असे म्हटले आहे तरी सुद्धा हा कायदा बदलला नाही. आनागारिक धम्मपाल श्रीलंके वरून बुध्दगयाला आले त्यांनी या विरुद्ध आवाज उठवला तेव्हा पासून हा लढा सुरु आहे. रिपाई नेते डॉ राजेंद्र गवई म्हणाले की, समाज एकत्रित आला तर काय होऊ शकते हे रीडल्स आंदोलनाने दाखवून दिले आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला जावे लागेल.

बुद्धभूमी मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भन्ते विनाचार्य म्हणाले की, मक्का मदिना मुसलमानांची आहे त्या प्रमाणे बुद्धगया बौद्धाची असली पाहिजे. भन्ते राहुल बोधी म्हणाले की, हिंदुची 40 लाख मंदिरे असतील आमचे एकच मंदिर आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे. माजी मंत्री सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, जपान, श्रीलंका, व्हियेतनाम बौध्द झाले परंतु भारत बौद्धमय झाला नाही. हिंदुच्या देवळात बुद्ध मूर्ती का ठेवत नाहीत, असे ही सुलेखा कुंभारे म्हणाल्या. कांग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, बौधगया मुक्ती आंदोलन देशातील विविध ठिकाणी सुरु आहे. बिहारचा टेम्पल ऍक्ट 1949 कायदा रद्द झाला पाहिजे हा आवाज लोकसभेत घुमला आहे. आपण शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान यांना भेटूया.
या प्रसंगी झालेल्या सभेत भन्ते हर्षबोधी, माजी मंत्री अविनाश महातेकर, आर पी आय. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, साहित्यिक अर्जुन डांगळे, कर्नाटक आर. पी आय नेते व्यंकटस्वामी, ऍड. जयदेव गायकवाड, तानसेन ननावरे, नितीन मोरे, बौद्धमहासभा अध्यक्ष चंद्रबोधि पाटील, बहुजन समाज पार्टीचे प्रा. धनराज, डॉ सुरेश माने, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर, आमदार संतोष बांगर यांनी पाठिंबा जाहीर केला.

रिपब्लिकन नेते नाना इंदिसें, भीमशक्ती संघटनेचे शशिकांत बनसोडे, युवानेते जयदीप कवाडे, दलित पॅन्थर अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, ऍड. दिलिप काकडे, अक्षय आंबेडकर, मिलिंद सुर्वे, भीम आर्मीचे अशोक कांबळे, रिप. खोरीपचे सुनील रामटेके, सागर संसारे, दिलिप जगताप, आदिची भाषणे झाली. गायक आनंद शिंदे यांनी चळवळीचे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी केले.















