
छत्रपतींच्या किल्ल्यांचा सन्मान – मंत्री प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने मीरा-भाईंदरमध्ये “किल्ले बनविणे स्पर्धेचे” आयोजन
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मीरा-भाईंदर : युनेस्कोने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि युवसेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा-भाईंदर शिवसेनेमार्फत मीरा-भाईंदर शहरात ‘किल्ले बनविणे स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मीरा-भाईंदरमधील इच्छुक स्पर्धकांना २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण इतिहासाचे जाणकार दिनांक २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यान करणार आहेत.
दिवाळी, फराळ आणि रांगोळीप्रमाणेच आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग म्हणून नागरिकांनी मिळेल त्या जागेत – घरासमोर, सोसायटीत, बागेमध्ये किंवा बाल्कनीत – किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून इतिहासाला उजाळा मिळतोच, शिवाय पुढील पिढ्यांच्या मनात आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान रुजविण्याचा हेतू आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत –
प्रथम पारितोषिक ₹15,000
द्वितीय पारितोषिक ₹10,000
तृतीय पारितोषिक ₹5,000
तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास ₹1,000 रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
शिवसेनेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरी, पद्मदुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग आणि लोहगड या दुर्गांच्या हुबेहुब प्रतिकृती सजावटीसह साकाराव्यात.
हा दीपावलीच्या आनंदात भर घालणारा आणि शिवछत्रपतींना मानवंदना देणारा सांस्कृतिक उपक्रम मीरा-भाईंदरकरांसाठी एक आगळावेगळा सोहळा ठरणार आहे.
या प्रसंगी मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि,
“छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले दुर्ग/किल्ले हे केवळ दगडी बांधकाम नसून आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. युनेस्कोने दिलेली जागतिक मान्यता हि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ‘किल्ले बनविणे स्पर्धा’ हा उपक्रम दीपावलीच्या आनंदात नवा उत्साह भरून काढेल आणि मीरा-भाईंदर शहरातील जनतेला आपल्या परंपरेशी अधिक जोडेल. असा या स्पर्धेचा प्राथमिक हेतू आहे.”















