
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार आता नगरसेवकपदासाठी रिंगणात
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मूल नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून शहरातील निर्भीड आणि सक्रीय पत्रकार म्हणून ओळख असलेले सतीश आकुलवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असताना आकुलवार यांच्या या निर्णयाने प्रभागातील राजकीय समीकरणात चुरस निर्माण झाली आहे.
पत्रकारितेद्वारे वर्षानुवर्षे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणारे आकुलवार आता थेट जनप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी काम करण्याचा निर्धार घेऊन मैदानात उतरले आहेत.
— “फक्त टीका करून चालत नाही, शहर बदलायचे असेल तर व्यवस्थेत उतरून काम करणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी विकासाचे स्पष्ट धोरण पुढे मांडले आहे.
सामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण, पारदर्शक कामकाजाची वचनबद्धता आणि भ्रष्टाचारमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वप्न घेऊन आकुलवार यांनी परिवर्तनाचा नारा दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही या उमेदवारीचे स्वागत केले असून, “न्यायासाठी लढणारी व्यक्ती आता आमच्या विकासासाठी लढणार ही विश्वासाची बाब आहे,” अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
प्रभाग 9 मधील ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















