prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचा प्रचार दणक्यात सुरू; ‘रावणाची लंका’ हनुमान दहन करणार – प्रताप...

मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचा प्रचार दणक्यात सुरू; ‘रावणाची लंका’ हनुमान दहन करणार – प्रताप सरनाईक यांचा घणाघात

0
95

८१ उमेदवारांसह प्रचार रॅलीला हनुमान मंदिरातून शुभारंभ; विकासाच्या धनुष्यबाणाने विजयाचे लक्ष्य

मिरा-भाईंदर, ३ जानेवारी २०२६ — मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज प्रचाराचा भव्य शुभारंभ करत शक्तिप्रदर्शन केलं. भाईंदर पूर्वेतील बी.पी. रोडवरील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि श्रीफळ फोडून प्रचार रॅलीला मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

“मिरा-भाईंदरमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या ‘रावणाच्या लंके’चा हनुमान दहन करेल,” असा घणाघात करत सरनाईक यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी आहे,” असं ते म्हणाले.

शिवसेनेचे ८१ अधिकृत उमेदवार, पदाधिकारी, महिला आघाडी आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. “अरे आवाज कुणाचा… शिवसेनेचा!” या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक ‘विकास आणि विश्वास’ या मुद्द्यावर लढवली जात असून, मुंबई आणि ठाणेप्रमाणेच मिरा-भाईंदरवरही भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.

सरनाईक यांनी यावेळी बी.पी. रोडवरील हनुमान मंदिराच्या ठिकाणी लवकरच एक भव्य मंदिर उभारण्याची घोषणाही केली. “८१ शिलेदार म्हणजे मिरा-भाईंदरच्या अस्मितेचे रक्षक आहेत. १६ जानेवारीला विजयाचा गुलाल शिवसेनेचाच उधळला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण शहरात शिवसेनेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, पक्षाच्या विजयाची शक्यता अधिक बळावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here