prabodhini news logo
Home चंद्रपूर भिवकुंड गावात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला माकडांचा उपद्रव अखेर संपुष्टात; ग्रामपंचायत...

भिवकुंड गावात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला माकडांचा उपद्रव अखेर संपुष्टात; ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना यश

0
190

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भिवकुंड गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून माकडांचा प्रचंड उपद्रव सुरू होता. माकडांचे कळप गावात मुक्तपणे फिरत असल्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. माकडे घरांच्या छतांवरून उड्या मारत घरांची कवल फोडत होती. अनेक घरांचे छप्पर खराब झाले होते तसेच घरातील अन्नसामग्री व इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

माकडांच्या धुमाकुळामुळे शेतीवरही मोठा परिणाम झाला होता. शेतांमधील पिके, फळबागा तसेच साठवलेला शेतमाल माकडांकडून नष्ट केला जात होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक यांच्यामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गंभीर समस्येची दखल घेत भिवकुंड ग्रामपंचायत व गावातील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन माकड पकडणाऱ्या विशेष तुकडींना पाचारण करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईसाठी केवळ ग्रामपंचायतच नव्हे तर संपूर्ण ग्रामस्थांनी देखील स्वयंस्फूर्तपणे आर्थिक मदत केली. ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य तसेच गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

संबंधित माकड पकडणाऱ्या तुकडीने नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक कारवाई करत संपूर्ण गावातील माकडांना पकडले. पकडण्यात आलेली सर्व माकडे गावापासून दूर असलेल्या सुरक्षित जंगल परिसरात नेऊन सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा गावात माकडांचा त्रास होणार नाही, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या माकडांच्या धुमाकुळामुळे त्रस्त झालेल्या भिवकुंड गावामध्ये आता शांततेचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होणार असून ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच माकड पकडणाऱ्या तुकडीचे आभार मानले आहेत. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here