
सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांचा इशारा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा, मा. नमिता बांगर यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांनी कडक शब्दांत मागणी मांडली.
देवाडा खुर्द गावात मागील अनेक वर्षांपासून विविध पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या असल्या तरी, आजतागायत गावाची पाणीसमस्या सुटलेली नाही. उलट अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विहिरींचे तात्काळ खोलीकरण व साफसफाई करून त्या वापरण्यायोग्य करण्यात याव्यात, तसेच त्या ठिकाणी सोलर पॅनल व पाण्याच्या टाक्या बसवून गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी ठोस मागणी मनीष राऊत यांनी केली आहे.
तसेच, गावातील काही विशिष्ट ठिकाणी नवीन हॅन्डपंप उभारून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास, गावकरी व सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
देवाडा खुर्द गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन काम सुरू करावे, अशी सर्वांची मागणी आहे.















