
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक
27 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून दूर
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या असल्या तरी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले. सत्ता स्थापन करता न आल्याने काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. निवडणुकीच्या अगदी आधी तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेसला महागात पडल्याची चर्चा पक्षांतर्गत जोर धरत आहे.
गेल्या सहा वर्षांपासून रामू तिवारी हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी आंदोलन, मोर्चे आणि विविध संघटनात्मक कार्यक्रमांद्वारे पक्ष संघटना मजबूत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे मजबूत संघटनेचा फायदा महानगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, महापालिका निवडणुकीच्या सुमारे एक महिना आधीच रामू तिवारी यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. या निर्णयामुळे पक्षाचे संघटनात्मक संतुलन बिघडले आणि त्याचा थेट परिणाम उमेदवारी वाटप प्रक्रियेवर झाला. अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करणाऱ्या आणि निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची तिकिटे कापण्यात आली. त्यांच्या जागी नव्या व कथित पसंतीच्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली.
या नाराजीचा परिणाम निवडणूक निकालातही दिसून आला. काँग्रेसला सुमारे 40 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र पक्षाला 27 जागांवरच समाधान मानावे लागले. परिणामी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही आणि सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागले. याच कारणामुळे महापौर निवडणुकीतही काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
सध्या काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या अगोदर संघटनेत करण्यात आलेले बदल आणि उमेदवारी वाटपातील त्रुटींमुळेच पक्ष सत्तेपासून दूर राहिल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः रामू तिवारी यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेससाठी आत्मघातकी ठरल्याची भावना आता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहे.















