
पोंभुर्णा तहसीलमधील प्रकार; तहसीदारांनी दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तहसील अंतर्गत नवीन गंगापूर येथील रहिवासी अनुप सुनील सोपनकार हा दिव्यांग युवक १ जानेवारी २०२५ पासून संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणाऱ्या मानधनापासून वंचित आहे. प्रशासनातील काही निष्कर्षी व दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मागील एक वर्षापासून त्याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
अनुप सोपनकार याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन हेच त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र, अर्ज सादर करूनही व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही त्याची फाईल प्रलंबित ठेवण्यात आल्याने त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी पोंभुर्णा तहसील कार्यालयात जाऊन तहसीदार दीपाली दिलीप आत्राम यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती देत संबंधित युवकावर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.
यावर तहसीदार दीपाली आत्राम यांनी प्रकरण गांभीर्याने घेत लवकरात लवकर चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच पीडित युवक अनुप सोपनकार यास त्याचे थकीत व चालू मानधन मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, प्रशासनाने अशा संवेदनशील योजनांबाबत अधिक दक्षता घेणे गरजेचे असून, गरजू लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी ठोस यंत्रणा राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















