
पोंभुर्ण्यात गैरप्रकारांचा संशय; प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पोंभुर्णा तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वितरित होणाऱ्या शासकीय धान्याबाबत गंभीर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात देवाडा खुर्द येथील मनीष यशवंत राऊत यांनी उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे.
निवेदनानुसार, काही व्यापारी लाभार्थ्यांकडून धान्य कमी दरात खरेदी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात धान्याची वाहतूक होत असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा असून संबंधित व्यवहारात अनियमितता असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ वस्तुस्थिती पडताळून पारदर्शक तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गरिबांच्या हक्काचे धान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात विलंब न करता संबंधित व्यवहारांची तपासणी करावी, जबाब नोंदवावेत, दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करावी व संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लवकरात लवकर प्रभावी व दृश्यमान कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे पोंभुर्णा तालुक्याचे लक्ष लागले आहे.















