prabodhini news logo
Home गडचिरोली देशव्यापी संप; गडचिरोलीत काँग्रेससह विविध संघटनांचा सहभाग

देशव्यापी संप; गडचिरोलीत काँग्रेससह विविध संघटनांचा सहभाग

0
65

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : देशातील विविध कामगार व शेतकरी संघटनांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी देशव्यापी संप व भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून संप पुकारला. या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून सर्वपक्षीय संघटनांच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी त्यांनी कामगार, शेतकरी, अंगणवाडी सेविका तसेच विविध घटकांच्या न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

आंदोलनाला संबोधित करताना ब्राम्हणवाडे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक व कामगारविषयक धोरणांवर तीव्र टीका केली. कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल हे कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे सांगत, वाढते कंत्राटीकरण कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी कमी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे कामगार वर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी वर्गासमोरही गंभीर समस्या उभ्या ठाकल्या असून शेतमालाला योग्य व कायदेशीर हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे त्यांनी सांगितले. खत, बियाणे, कीटकनाशके व इंधन दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कामगार व शेतकरी वर्गाच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून संघर्ष करत राहील, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या आंदोलनात माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, नगरसेवक सतीश विधाते, रमेशचंद्रजी दहिवले, मा. क. प. अध्यक्ष अमोल मारकवार, भा. क. प. अध्यक्ष देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, समशेरखा पठाण, वसंत राऊत,अनिल कोठारे, दिवाकर निसार, धिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, सौं. कविताताई उराडे तसेच आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड यांच्यासह सर्वपक्षीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, काँग्रेस पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी बांधव, महिला वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here