prabodhini news logo
Home ठळक बातम्या वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला...

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

0
80

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ आणि ८९ मधील रहिवाशांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रहिवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर, म्हाडा प्रशासनाने नमती भूमिका घेत या दोन्ही चाळींमधील पात्र रहिवाशांचा समावेश ‘इमारत क्रमांक ६’ मध्ये करूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून बी.डी.डी. चाळ ८८ व ८९ मधील रहिवासी आपल्या हक्कासाठी म्हाडा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मूळ आराखड्यानुसार या रहिवाशांना इमारत क्रमांक ६ मध्ये स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. अनेक पक्षांनी आणि संघटनांनी यासाठी प्रयत्न केले, परंतु ठोस निर्णय होत नव्हता. अखेर हतबल रहिवाशांनी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने म्हाडा मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाची तीव्रता पाहता, बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रहिवाशांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर, जैस्वाल यांनी रहिवाशांची मागणी तत्काळ मान्य केली. २७ जानेवारी रोजी रद्द झालेली लॉटरी आता सुधारित पद्धतीने, म्हणजेच चाळ क्रमांक ८८ व ८९ चा समावेश करूनच काढली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, उपाध्यक्ष राकेश कांबळे, आकाश दोडके, समीर कांबळे, संतोष आंबुलगे, सतीश राजगुरू, मिलिंद जाधव, अशोक गुजेट्टी, मनोज मर्चंडे, राजेंद्र बडेकर, राज सावंत, विक्रांत गमरे, आदेश साळवी, विक्रांत कांबळे आणि निर्भय माने यांसह मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here