prabodhini news logo
Home अहेरी अहेरीत फेरीवाल्यांवर कारवाईविरोधात भाकपाचा आक्रमक पवित्रा; चौकशीसह नुकसानभरपाईची मागणी

अहेरीत फेरीवाल्यांवर कारवाईविरोधात भाकपाचा आक्रमक पवित्रा; चौकशीसह नुकसानभरपाईची मागणी

0
66

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शहरातील फेरीवाले, टपरीधारक व लघु व्यवसायिकांवर “अतिक्रमण” कारवाईच्या नावाखाली करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने आज उप्पर जिल्हाधिकारी तसेच नगरपंचायत अहेरीच्या मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनातून प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत विविध मागण्या करण्यात आल्या.

या निवेदनावर कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव) व कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, अहेरी शहरात कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे विस्कळीत झाला असून, त्यांच्या रोजीरोटीवर थेट परिणाम झाला आहे.

भाकपाच्या वतीने उप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायत अहेरीच्या मुख्याधिकाऱ्यांकडेही स्वतंत्र तक्रार दाखल करून ही कारवाई नेमकी कोणत्या नियमांनुसार करण्यात आली, याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या करण्यात आल्या:

* अतिक्रमण कारवाईत नुकसान झालेल्या फेरीवाले, टपरीधारक व दुकानदारांना नुकसानभरपाई तात्काळ द्यावी
* ज्याठिकाणी व्यवसाय सुरू होता, त्याच जागी स्टॉल, टपरी व दुकाने पुन्हा लावण्यास परवानगी द्यावी
* संबंधितांना उपजीविका करण्याचा हक्क अबाधित ठेवावा
* कोणत्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली, याची स्पष्ट माहिती जाहीर करावी
* विना नोटीस व विना सूचना कारवाई कशी करण्यात आली, याचे स्पष्टीकरण द्यावे
* अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यक असलेले अधिकृत परवानगी पत्र (ऑर्डर) सार्वजनिक करावे

निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या अचानक कारवाईमुळे गरीब व कष्टकरी वर्गावर अन्याय होत असून प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणे आवश्यक आहे.

भाकपाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर वरील मागण्या तात्काळ मान्य करून न्याय दिला गेला नाही, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर लढाही उभारला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here