prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीरा रोड अग्नितांडव प्रकरणी मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप; बाधितांना २४ तासांत मदतीचे...

मीरा रोड अग्नितांडव प्रकरणी मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप; बाधितांना २४ तासांत मदतीचे आदेश

0
66

मीरा रोड : येथील प्लेझंट पार्क परिसरातील कृष्णस्थळ संकुलातील गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या दुर्घटनेची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
आगीमुळे शेजारील चार इमारतींनाही मोठा फटका बसला असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाहणी करताना मंत्री सरनाईक यांनी बाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
२४ तासांत पंचनाम्याचे आदेश
या प्रकरणी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मंत्री सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका, अग्निशमन विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. “पुढील २४ तासांत सर्व नुकसानग्रस्त कुटुंबांचे पंचनामे पूर्ण करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
अग्निशमन दलाच्या विलंबाची चौकशी
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. या संदर्भात मंत्री सरनाईक यांनी गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे संकेत
या दुर्घटनेमागे अनधिकृत गोदामे व बांधकामांचा मोठा वाटा असल्याचे निदर्शनास येत असल्याने अशा बेकायदेशीर संरचनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“शासन बाधितांच्या पाठीशी”
“या आगीत केवळ मालमत्ता नाही, तर सामान्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचे नुकसान झाले आहे. प्रत्येक बाधित कुटुंबाला न्याय आणि मदत मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे सांगत मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना दिलासा दिला.

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here