
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास मालार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले,“जयंतीचा एक दिवस आणि कृतीचे ३६४ दिवस हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समता, ममता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर जपला. तळागाळातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करून देशात वैचारिक क्रांती घडवून आणली.चंद्रपूर जिल्हा हा डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून कार्य करणारा जिल्हा असून नागपूर आणि चंद्रपूर या भागांशी ऐतिहासिक दीक्षाभूमीचा वारसा जोडलेला आहे. याच भूमीत डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा देत सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू केला. “जय भीम”चा घोष हा या जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर सतत अग्रस्थानी ठेवणारा प्रेरणास्रोत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास पालकमंत्री अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, आयुक्त नरेश अकनूरी तसेच महापौर संगिता खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.















