prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – कामगार दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – कामगार दिन

0
48

कारखान्यातील सायरनने
कामगाराच्या दिवसाची सुरुवात ,
दिवसभर काबाडकष्ट करून
लावतो कुटूंबासाठी सांजवात.

मशीनच्या घरघरत्या आवाजात
आयुष्याचं फिरत राहतं चक्र,
सुटत नाही गुंता समस्यांचा
सरकतं कुटूंबाचं कालचक्र.

श्रम करण्यात नेहमी पुढे
कामगार देशाचा आधार,
क्षेत्र असो कोणतेही
कार्याला देतो योग्य आकार.

कामगार करतो मेहनत
लावतो उत्पादनात हातभार,
तुटपुंज्या पगारात करतो
तडजोडीने घर कारभार.

कर्तव्यावर सदा प्रामाणिक
असो दिवस वा असो रात्र,
यंत्राशी जोडून ठेवतो नाते
तरीही थकत नाहीत गात्र.

संसाराचा गाडा चालविण्या
करतो तारेवरची कसरत,
जगतो जीवन स्वाभिमानी
कुणापुढे हात नाही पसरत.

भीषण महागाईत जमाखर्चाचा
जीवनभर हिशोब मांडतो,
मनातल्या दुःखाचा पाऊस
नित्य डोळ्यातून सांडतो.

मुलांच्या भविष्याची काळजी
सदा डोळ्यात घेऊन राहतो,
स्वप्नांना साकार करण्यास
जिम्मेदारीचे ओझे वाहतो.

श्रीमंतीच्या पैशासारखी
करत नाही कधीच हाव,
फक्त मागणं एवढचं असतं
श्रमाला मिळावा रास्त भाव.

झेलत राहतो मनावर
सतत पाऊस दुःखाचा,
आशादायी जीवन जगतो
येईल एक दिवस सुखाचा.

त्याच्याही दबलेल्या वेदनांना
कधीतरी योग्य न्याय मिळावा,
कधीतरी त्याच्या आयुष्याने
समाधानाचा घास गिळावा.

कधीतरी पूर्णत्वास यावे
कामगारांच्या श्रमाचे मोल,
कुणीतरी जाणून घ्यावेत
त्याच्या अंतरीचे सच्चे बोल.

रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here