
सह्याद्रीच्या कड्याकपाारीत
घुमतो गर्जा महाराष्ट्र माझा,
मराठी मातीचा अभिमान अन्
थोर शिवरायांचा राजा…
रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून
गडचिरोलीच्या वनापर्यंत,
संतांच्या पावन विचारांचा जागर
येथे दिसे अनंत…..
क्रांतिसूर्य जोतिबांनी दिला
शिक्षणाचा अनमोल वारसा,
भीमरायांच्या लेखणीने घडवला
प्रगतीचा नवा आरसा….
अठरापगड जाती-धर्माचे
नाते येथे अतूट गुंफले,
श्रमाच्या घामाने हे राज्य
नंदनवनागत फुलले….
लेणी अजिंठा-वेरुळची ही
कलेचा वारसा सांगती,
वारकरी संप्रदायाची पताका
फडकते भक्तीच्या ओढती. ….
साहित्य, संस्कृती अन् कलेचा
येथे वसा महान आहे,
मराठी मनाच्या ओठावर
प्रगतीचेच गोड गाणे आहे….
महाराष्ट्र दिनाच्या या दिनी
शपथ आपण ही घेऊया,
एकतेच्या बळावर राज्याला
शिखरावर नेऊया….
समता, बंधुता अन् प्रेमाचा
ध्वज उंच धरूया हाता,
वंदन करतो तुला मनापासून,
हे माझ्या महाराष्ट्र माता…..
सौ अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















