Home ठळक बातम्या अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती; नवजात बालकाच्या विल्हेवाट प्रकरणात ११ जणांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती; नवजात बालकाच्या विल्हेवाट प्रकरणात ११ जणांवर गुन्हा

0
111

मालेगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : शहरात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीची गुप्तपणे प्रसूती करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असून बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

या प्रकरणात दोन डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध POCSO कायदा तसेच बेकायदेशीर प्रसूती आणि बालकाच्या हस्तांतरणासंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेले तत्कालीन मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना ते हसताना दिसून आल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून समोर आले आहे. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही देहबोली चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच सर्व आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here