Home छत्रपती संभाजीनगर NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा...

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन

0
99

औरंगाबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली आहे. यासाठी शहरात पोस्टर लावून त्यांनी निषेध व्यक्त केला.

जाधव यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये NEET परीक्षेला बसलेल्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वारंवार समोर येणाऱ्या परीक्षा अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पोस्टरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. NEET परीक्षेत वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणखी किती विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर उद्ध्वस्त होणार, आणखी किती विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जाणार आणि आपल्या मुलांना गमावण्याचे दुःख आणखी किती पालकांना सहन करावे लागणार, असे सवाल करण्यात आले आहेत.

शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here