Home ठळक बातम्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बस-ट्रक धडकेत २५ जखमी, ११ जणांची प्रकृती गंभीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बस-ट्रक धडकेत २५ जखमी, ११ जणांची प्रकृती गंभीर

0
135

मेहकर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. मेहकरजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या खासगी बसला मेहकर परिसरात ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिक, महामार्ग पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या ११ प्रवाशांवर विशेष वैद्यकीय उपचार सुरू असून, काहींना पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याची तयारी करण्यात येत आहे.
अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
या भीषण अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here