पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन लाखांची सुपारी दिली. त्यानुसार, त्या सराईत गुन्हेगारांनी पतीवर हल्ला केला. मात्र, तोही प्लान फसला. हल्ला केल्यानंतर आरोपी पती मृत झाल्याचे समजून तिथून निघून गेले होते.
शिवम दुबे उर्फ दुब्या आणि अमन पुजारी अशी हल्लेखोरांची नावं आहेत. तसेच, सुपारी देणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जखमी व्यक्तीच्या मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लग्नानंतर आरोपी असलेल्या महिलेला आठही मुली झाल्या होत्या. त्यावरून पती तिचा वारंवार छळ करत होता. तसेच, त्याने दुसरे लग्न करण्याची देखील तयारी केली होती. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याचा राग मनात धरून काटा काढण्याचं ठरवलं. तिने रागाच्या भरात पतीवर विष प्रयोग केला होता. मात्र तो फसला. त्यामुळे तिने शेजारी राहणारा सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला पतीला मारण्याची दोन लाखांची सुपारी दिली.
त्यासाठी पुजारी याने मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. त्याने सुपारी मिळालेल्या पैशातून तलवारी देखील विकत घेतल्या. ७ डिसेंबरच्या रात्री पती दारू पिऊन झोपला असल्याचे पत्नीने हल्लेखोरांना सांगितले. संपूर्ण खबरदारी घेत आरोपींनी घरात घुसून पतीवर तलावरीने सपासप वार केले. पती मेल्याचे समजून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. मात्र, पती बचावला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यात पोलिसांनी आरोपी अमन पुजारी याला ओळखले. सूत्र हलवत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता जखमी पतीच्या पत्नीनेच आम्हाला सुपारी दिल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे.

